
जिल्हा परिषद कर्मचारी (ZP Employee) आज तिसऱ्या दिवशी आक्रमक पवित्रा घेत थाळीनाद करत जुनी पेन्शनसोबत (Old Pension Scheme) कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा नारा देण्यात आला.
सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी (ZP Employee) आज तिसऱ्या दिवशी आक्रमक पवित्रा घेत थाळीनाद करत जुनी पेन्शनसोबत (Old Pension Scheme) कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा नारा देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात राज्य शासनाने जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात गठीत केलेल्या समितीच्या नावाने थाळी नाद करण्यात आला.
गोलाकार करून थाळीवर चमचा आपटून त्या समितीच्या निषेध करण्यात आला. वेतन त्रुटी दूर करा. गेल्या २० वर्षापासून सेवेत कार्यरत असलेल्या पाणी व स्वच्छता विभागातील जिल्हा कक्षातील कर्मचारी व बीआरसी व सीआरसी यांना कायम करा. इतर सर्व विभागातील कंत्राटी कर्मचारी कायम करा. अशा विविध घोषणा देण्यात आल्या. मागासवर्गीय कर्मचारी यांना पदोन्नती द्या, वेतन त्रुटी दूर करा, जिल्हा परिषदेच्या आवारात आज शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी व कंत्राटी कर्मचारी यांना शासन सेवेत कायम करण्यासाठी संपाचा तिसरा दिवस पाळण्यात आला.
या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कर्मचारी संघटनेचे अरूण क्षीरसागर, गिरीष जाधव, मनीष सूरवसे, नागेश पाटील, पाणी व स्वच्छता कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव, मोहित वाघमारे, महिला कर्मचारी अश्विनी शिंदे, उषा भोसले, सविता मिसाळ, आरती माडेकर उपस्थित होते. यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
जुनी पेन्शन लागू करा, वेतन त्रुटी दूर करा, कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम करा, मागासवर्गीय कर्मचारी यांना पदोन्नती देणे अशा विविध मागण्यांचा आक्रोश करण्यात आला. गोलाकार पध्दतीने उभे राहून कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीची नावाने थाळी नाद आंदोलन करण्यात आले. थाळी नाद आंदोलन करीत महिला व पुरूष कर्मचारी पूनम गेटवर आंदोलनस्थळी आले.