दडिवडीच्या अस्थिव्यंग शाळेत १३ लाखांचा अपहार ; मुख्याध्यापकासह अधीक्षकावर गुन्हा दाखल

दहिवडी (ता. माण) येथील अस्थिव्यंग मुलांच्या निवासी शाळेला अनुदानापोटी आलेले १३ लाख १ हजार ६२५ रुपये मुख्याध्यापक व अधीक्षकाने परस्पर खर्च करून अपहार केले. यावरून संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल झाला

    दहिवडी : दहिवडी (ता. माण) येथील अस्थिव्यंग मुलांच्या निवासी शाळेला अनुदानापोटी आलेले १३ लाख १ हजार ६२५ रुपये मुख्याध्यापक व अधीक्षकाने परस्पर खर्च करून अपहार केले. यावरून संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल झाला असून श्रीराम शिवाजी गोफणे (रा. सोमंथळी, ता. फलटण) असे मुख्याध्यापकाचे, तर अमोल मच्छिंद्र लांडगे (रा. खानोटा, ता. दौंड, जि. पुणे) असे अधीक्षकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सचिन प्रल्हाद देवकुळे (रा. दहिवडी) यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली आहे.

    याबाबत माहिती अशी की, अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था दहिवडीमार्फत अस्थिव्यंग मुलांची निवासी शाळा चालविण्यात येते. या शाळेत श्रीराम गोफणे मुख्याध्यापक म्हणून आहेत. अधीक्षक म्हणून तात्पुरत्या स्वरूपात अमोल लांडगे याला घेतले होते. या दोघांनी आपापसांत संगनमत करून शाळेच्या ठरावाच्या खोट्या नकला व त्यांची वैयक्तिक कागदपत्रे बँकेत देऊन अकाउंट काढले. समाज कल्याण विभागाकडून सहायक परिपोषण अनुदानापोटी संस्थेला आलेले १३ लाख १ हजार ६२५ रुपये त्या अकाउंटमध्ये घेतले. संस्थेची कोणतीही संमती न घेता, संस्थेला थांगपत्ता लागू न देता रक्कम परस्पर खर्च करून संस्थेची फसवणूक केल्याचे समोल आले आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार खाडे हे करीत आहेत.