आश्रमशाळा शिक्षक, कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी 14 मार्चपासून जाणार बेमुदत संपावर

आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये विविध प्रलंबित मागण्या आहेत. त्यामध्ये आदिवासी विकास विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांची पदोन्नतीची प्रकिया पुर्ण करणे.

चाकण : सीटू संलग्न आदिवासी विकास विभाग निवासी आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना यांच्या वतीने आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे (Nayana Gunde) यांना निवेदन देऊन त्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली होती. त्याप्रसंगी डॉ. कराड बोलत होते. यावेळी बेमुदत संपाबाबत चर्चा विनीमय होऊन १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याबाबत निश्चित करण्यात आले. या प्रसंगी राज्यातील सर्व विभागातील विभागीय अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनामध्ये विविध प्रलंबित मागण्या आहेत. त्यामध्ये आदिवासी विकास विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांची पदोन्नतीची प्रकिया पुर्ण करणे, इ.१ली ते ४थीचे वर्ग पटसंख्या अभावी बंद न करणे, माध्यमिक शिक्षकांना मुख्याध्यापक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदावर पदोन्नती देणे, आश्रमशाळांना नैसर्गिक वर्ग वाढ देणे, समुपदेशनाने व आँनलाईन विकलपानुसार नियतकालिक बदल्या करणे, दुर्गम भागात काम करणाऱ्या शिक्षकांना भाडेमाफ निवासस्थान योजनेचा लाभ देणे, २०२२चा आकृतीबंध रद्द करणे.

यासह जून २०२३ पासून लागू होणाऱ्या स.७.३०ते सायंकाळी ३.३० हे नवीन संभाव्य आणि अन्यायकारक वेळापत्रक रद्द करावे इ. विविध प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करून बेमुदत संपावर जाण्याबाबत निश्चित करण्यात आले. याप्रसंगी आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त अविनाश चव्हाण, उपायुक्त सुदर्शन नगरे, निवासी अप्पर आयुक्त तुषार माळी, तसेच कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष एस.जे. शेवाळे, ठाणे विभागीय अध्यक्ष राजेश पाटील, नाशिक विभागीय अध्यक्ष अमोल वाबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.