पर्यटकांची पावले कोकणाकडे वळु लागल्याने स्थानिकांना रोजगाराच्या संधी

निळ्या शांत दुरवर पसरलेल्या समुद्र किनाऱ्यांबरोबरच ॲग्रो टुरीझम व कातळशिल्प पर्यटकांचे खास आकर्षण

  राजापूर : बायकॉट मालदीवचा नारा सोशल मिडियावर घुमू लागल्यानंतर या हंगामात पर्यटकांची पावले कोकण भुमीत पडु लागली आहेत. कोकणातील सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षण ठरले असुन दापोली तालुक्यापासुन अगदी राजापूर तालुक्यातील अनेक समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. राजापूर तालुक्यातील कशेळी बीच पॉइंट पर्यटकांच्या चांगलाच पसंतीस उतरला असुन या ठिकाणी पर्यटक हजेरी लावत आहेत. तर पाचल तळवडे येथील पितांबरी कृषी पर्यटन केंद्राने पर्यटकाना भुरळ घातली आहे.

  कोकण म्हटले की देवभुमी, अपरांत भुमी आणि या कोकणची ओढ कायम अनेकांना लागुन राहीली आहे. गेल्या काही वर्षात कोकणात पर्यटकांची पावले वळु लागली आहेत. प्रारंभी कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर रेंगाळत एक दिवसाचे पर्यटन करणारा पर्यटक आता कोकणात थांबु लागला आहे. त्यातुन कृषी पर्यटन केंद्राना इथे येणाऱ्या पर्यटकांची सर्वाधिक पसंती आहे.

  सध्या गणपतीपुळे रत्नागिरी पावस असा प्रवास केल्यानंतर पर्यटक आडिवरे येथील तावडे भवनला थांबून दुसऱ्या दिवशी आडिवरे महाकाली वेत्ये बीच कशेळी बीच पॉइंट या भागांना सर्वाधिक पसंती देताना दिसत आहेत. कशेळी बीच पॉइंटवर सातत्याने असणारी पर्यटकांची रीघ स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणारी ठरली आहे.

  कातळशिल्प पर्यटकांचे आकर्षण –
  कोकणात जाभ्या दगडाच्या कातळावर असणारी मध्ययुगीन कातळ शिल्पही पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहेत. राजापूर शहरापासुन जवळच असलेल्या बारसु येथील कातळशिल्प पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरले आहे. या कातळशिल्पाला युनेस्कोच्या यादीत स्थान (जागतिक वारसा हक्का) मिळण्याची शक्यता आहे. तर हे कातळशिल्प मानवी इतिहासाच्या पाउलखुणा असल्याचे मानले जात आहे. या ठिकाणी असणारे दोन वाघांच्या मानेला धरुन उभा असणाऱ्या मानसाचे चित्र जगातील चार पुरातन संस्कृतींशी साधर्म्य सांगणारे आहे. त्यामुळे पर्यटक या कातळशिल्पाला मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत.

  कृषी पर्यटन –
  कोकणात सध्या मोठ्या प्रमाणात कृषी पर्यटन केंद्रांची उभारणी होत असुन स्थानिक पर्यटकांसह देश विदेशातील पर्यटक या कृषी पर्यटन केंद्राना पसंती देत आहेत. राजापूर तालुक्यातील गणेश ॲग्रो फार्म व आता पितांबरी कृषी पर्यटन केंद्र सर्वच प्रकारच्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.

  जुवे बेट –
  जैतापूरपासुन हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मात्र चारही बाजुने पाण्याने वेढलेल्या जुवे बेटावर पर्यटक चांगलेच रमू लागले आहेत. ऐतिहासिक पार्श्वभुमी असणारे जुवे बेट पर्यटकांना गजबजाटापासुन दुर नेत शांतीचा अनुभव देणारे ठरत असल्याने अनेक पर्यटक या जुवे जैतापूर बेटाला भेट देताना दिसुन येत आहेत.

  उन्हाळे – राजापूरची गंगा – धोपेश्वर – याच पर्यटनाच्या हंगामात राजापूरची प्रसिध्द गंगा अवतरल्याने पर्यटकांची पावले गंगास्नानासाठी वळु लागली आहेत. राजापूर शहरापासुन दोन किलोमिटच्या अंतरावर असणाऱ्या गरम पाण्याच्या कुंडावर स्नान करुन अनेक पर्यटक गंगास्नानाची पर्वणी साधत आहेत व गंगा स्नान झाल्यानंतर कोकणची दक्षिण काशी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पुरातन श्री देव धुतपापेश्वर मंदिराला भेट देताना दिसुन येत आहेत .

  पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे घाट पर्यटकांना खुणावु लागले –
  सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करुळ घाट बंद असल्याने पश्चिम महाराष्ट्राकडे प्रवास करणारा पर्यटक राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटाला पसंती देत आहे. मुंबइ, पुणे कोल्हापूर सांगली सातारा या भागाकडे जाणारा पर्यटक सध्या मोठ्या प्रमाणात अणुस्कुरा घाटाचा वापर करताना दिसुन येत आहे . या अणुस्कुरा घाटातील निसर्ग सौंदर्य पर्यटकाना भुरळ घालत असुन अनेक पर्यटक व प्रवासी या घाटात घुटमळताना दिसुन येतात . इथे सातत्याने पर्यटक थांबत असल्याने स्थानिकाना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत .

  कोकणी खाद्याला सर्वाधिक पसंती –
  कोकणात येणारा पर्यटक सध्या मोठ्या हॉटेल पेक्षा खास कोकणी पध्दतीच्या जेवणाला सर्वाधिक पसंती देत असुन स्थानिक खाद्याला सर्वाधिक मागणी आहे . चुलीवरची भाकरी, गावठी कोंबडी वडे, घावणे, आंबोळी, आंब्याचे रायते, फणसाची भाजी व हाफुसची चव पर्यटकांच्या जीभेवर चांगलीच रुळली आहे.

  कोकणात पर्यटक – पण शासन उदासिन –
  गेल्या काही वर्षात कोकणात मोठ्याप्रमाणात पर्यटक येवु लागला असला तरी शासन स्तरावरुन अद्यापही म्हणावा तसा या पर्यटन स्थळांचा विकास झालेला नाही . रस्ते व अन्य सोयीसुविधांच्या बाबतीत अद्यापही अनेक पर्यटन स्थळे अविकसित आहेत . मध्यंतरी बायकॉट मालदीव चा नारा देत .. चला कोकण बघुया अशी हाक भाजपाने दिली होती . त्याला पर्यटकानी चांगलाच प्रतिसाद दिला असला तरी इथली असुविधांचे आगर असलेली ही पर्यटन स्थळे जर या पर्यटकाला पुन्हा कोकणाकडे वळवणारी ठरण्यासाठी आता शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे आहे . पर्यटकांसाठी पायाभुत सोयी सुविधा निर्माण केल्यास कोकण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर अजुन झळकेल यात तिळमात्र शंका नाही . त्यामुळे कोकणी माणसाच्या शासनाच्या भुमिकेकडे नजरा लागुन राहिल्या आहेत.