जुन्नर वनविभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणे हटवली; वनविभाग, महसूल विभाग, पोलीस यंत्रणेची संयुक्त कारवाई

जुन्नर वनविभागाच्या अखत्यारितील शिरूर खेड आंबेगाव व जुन्नर या चार तालुक्यांमध्ये वन जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यास बुधवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.

    नारायणगाव : जुन्नर वनविभागाच्या अखत्यारितील शिरूर खेड आंबेगाव व जुन्नर या चार तालुक्यांमध्ये वन जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यास बुधवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. याचा एक भाग म्हणून गुरुवारी (दि. ७) जुन्नर तालुक्यातील सहा गावांमध्ये वन जमिनीवर करण्यात आलेली अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. यासाठी मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.

    यात येडगाव, वडगाव कांदळी, नगदवाडी कांदळी, भोरवाडी, खोडद , हिवरेतर्फे नारायणगाव या गावांमध्ये असलेल्या वनविभागाच्या वनजमिनीमधील ६२ हेक्टर वन जमिनीवर लोकशासन आंदोलकांकडून अतिक्रमण करण्यात आले होते. येथे जमिनीमध्ये अनेक कुटुंबीय शेती करून तसेच झोपड्या करून वास्तव्य करत होती. लोकशासन आंदोलकांनी वनजमिनींमध्ये शाळू, सोयाबीन, हरभरा, मठ, हुलगे, गहू , केळी आदी पिके घेतली होती.

    एवढेच नव्हे तर एका ठिकाणी वन जमिनीत विहीरदेखील खोदण्यात आली होती. येडगाव येथे ९ हेक्टर, नगदवाडी कांदळी येथे १२ बारा हेक्टर, वडगाव कांदळी येथे २७ हेक्टर, खोडद येथे ५ हेक्टर , हिवरे तर्फे नारायणगाव येथे ९ हेक्टर वनक्षेत्रात असे एकूण ६२ हेक्टर वनक्षेत्रात आंदोलकांनी अतिक्रमण केले होते.

    यांच्या पथकाने केली कारवाई

    जुन्नर उपवनसंरक्षक अमोल पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, नारायणगावची सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण इतर पोलीस व वनखात्याचे कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.