कोरोनानंतर विदर्भात स्क्रब टायफस रोगाची एन्ट्री

गेल्या काही दिवसात स्क्रब टायफसमुळे विविध खासगी रुग्णांलयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली असून पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने या आजाराची गंभीरता वाढली आहे.मात्र, या संदर्भात आरोग्य विभागाकडे अद्याप तरी या संदर्भात फारसी माहिती उपलब्ध नाही,त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    नागपूर : पावसाचा लपंडाव सुरू असल्याने नागपुरात साथीचे आजार वाढू लागले आहेत. कोरोना, स्वाईन फ्ल्यूनंतर विदर्भात स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसून येतं आहे. गेल्या काही दिवसात स्क्रब टायफसमुळे विविध खासगी रुग्णांलयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली असून पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने या आजाराची गंभीरता वाढली आहे.मात्र, या संदर्भात आरोग्य विभागाकडे अद्याप तरी या संदर्भात फारसी माहिती उपलब्ध नाही,त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागपूर विभागात नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यतः पावसाळ्यात स्क्रब टायफसचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

    उपराजधानी नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली आहे. मात्र,गेल्या महिन्यात स्वाईन फ्ल्यूचा आजाराने डोकं वर काढल्याने चिंता वाढली असताना आता स्क्रब टायफसचा आजार हळूहळू वाढताना दिसून येतो आहे. १ सप्टेंबर रोजी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मध्ये स्क्रब टायफसमुळे एकाचा मृत्यू झाला होता. तर ग्रामीण भागातील एका रुग्णाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मेडिकल रुग्णालयात आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या १०० पेक्षा अधिक रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.