सायकलवरून ८०० किमीचा रायगड प्रवास करून कुरुंदवाडच्या तरुणांकडून पर्यावरण जागृती

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन ६ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने पर्यावरणाचे महत्त्व आणि व्यसनमुक्तीच्या प्रसारासाठी कुरुंदवाडच्या तरुणांनी सायकलस्वारीला महत्व देत विविध ठिकाणी भेट देण्याचा निर्धार केला.

    कुरुंदवाड : कडक तापमान आणि डोंगरदऱ्या अशा आव्हानात्मक परिस्थितीवर मात करत कुरुंदवाड येथील सचिन गोपाळ आडसुळ, वैभव विकास भाट, अजय संजय चव्हाण या तीन तरुणांनी कुरुंदवाड ते रायगड आणि रायगड ते कुरुंदवाड असा ८०० किमीचा पल्ला सायकलवरून पार केला.

    महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन ६ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने पर्यावरणाचे महत्त्व (Environmental Awareness) आणि व्यसनमुक्तीच्या प्रसारासाठी कुरुंदवाडच्या तरुणांनी सायकलस्वारीला महत्व देत विविध ठिकाणी भेट देण्याचा निर्धार केला.

    बुधवारी (दि.१५) सकाळी कुरुंदवाड येथील शिवतीर्थ जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून सचिन गोपाळ आडसुळ, वैभव विकास भाट, अजय संजय चव्हाण या तीन तरुणानी सायकलवरून रायगड प्रवासाला सुरवात केली आणि शुक्रवारी रायगड किल्ल्यावर पोहोचल्यानंतर रायगड किल्ला सर करत किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला.

    तसेच रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून कुरुंदवाड परतीचा प्रवास सुरु केला. आपल्या घरी परतल्यानंतर येथील शूरवीर संताजी घोरपडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी विजय मोगणे, संदिप आडसुळ, तुकाराम पवार, अशोक कोलापुरे यांनी त्याचे स्वागत केले.