
राजधानी , गावठाण भेंडवडे मध्ये सत्तांतर : साळशिंगे, देवनगरला सत्ता कायम , फटक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव
विटा : खानापूर तालुक्यात चार ग्रामपंचायत निवडणूका झाल्या. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या गटाला समान संधी मिळाली आहे. प्रत्येकी दोन ग्रामपंचायती मध्ये सत्ता स्थापन केली आहे. राजधानी भेंडवडे व गावठाण भेंडवडे येथील ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले. देवनगर व साळशिंगे येथे सत्ता कायम राहिली. आमदार बाबर गटाकडे गावठाण भेंडवडे , देवनगर मध्ये सत्ता आहे. तर माजी आमदार पाटील गटाकडे साळशिंगे, राजधानी भेंडवडे सत्ता आली. आहे. तांदळगाव मध्ये मोनिका संभाजी चव्हाण , देवनगर मध्ये सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
विजयी उमेदवार व समर्थकांनी गुलालाची उधळण , फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांनी काम पाहिले. शांततेत निवडणूक झाली.
खानापूर तालुक्यात या टप्प्यामध्ये एकूण ४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यामध्ये आज सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्यांदा देवनगर त्यानंतर साळशिंगे , भेंडवडे राजधानी , गावठाण भेंडवडे अशी मतमोजणी झाली. मतमोजणी प्रक्रिया येथील महसूल भवनाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर झाली . साळशिंगे मध्ये सरपंच पदाच्या सर्वसाधारण महिला या जागेसाठी लढत होती. येथे सरपंच पद सर्वसाधारण आहे. ८७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सरासरी ८७.८९ टक्के मतदान झाले होते. सरपंच पदाच्या जागेसाठी झालेल्या लढतीत छाया भीमराव पवार या विजयी झाल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी आमदार बाबर गटाच्या गौरी विश्वासराव जाधव यांच्यावर केवळ पाच मतांनी मात केली. छाया पवार यांना ८४७ तर विरोधी गौरी जाधव यांना ८४२ मते मिळाली. या ठिकाणी नोटाला २ मते पडली आहेत. खानापूर पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषा बागल यांंच्या बहिण गौरी यांचा धक्कादायक पराभव झाला.
साळशिंगे ग्रामपंचायतीवर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटाने सोशल मीडिया द्वारे दावा केला आहे. तिसऱ्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती महिला या जागेसाठी झालेल्या अंजना बंडू कांबळे आणि ज्योती संतोष यादव यांच्या लढतीत दोघींनाही २९१ अशी समसमान मते पडली. या ठिकाणी नोटाला ११ मते पडली आहेत. त्यामुळे या जागेसाठीचा निकाल राखून ठेवला आहे. त्यानंतर पुनर्मतमोजणी करण्यात आली. मात्र, मतांच्या आकडेवारीत फरक होत नसल्याचे पाहून तहसीलदार गायकवाड यांनी चिट्ठी काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार समयरा मुजफ्फर जमादार या सहा वर्षाच्या मुलीने ज्योती यादव हिची चिठ्ठी उचलली. त्यामुळे ज्योती यादव यांना विजयी घोषित करण्यात आले.साळशिंगे मध्ये माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या गटाने सत्ता अबाधित राखली.
भेंडवडे गावठाणच्या सरपंचपदासाठी तिरंगी लढत झाली
यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे समर्थक वैभव जानकर विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी यशवंत जाधव यांच्यावर ३०२ मतांनी मात केली. वैभव जानकर यांना ६७५ तर विरोधी अपक्ष यशवंत जाधव यांना ३६८ मते पडली आहेत. या ठिकाणी तिरंगी लढत होती. आमदार बाबर गटाचे वैभव जानकर, आमदार राष्ट्रवादीचे सुजित जानकर आणि अपक्ष यशवंत जाधव अशी लढत झाली. गावठाण भेंडवडे मध्ये सत्तांतर झाले आहे. वैभव जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष किसन जानकर यांचे पुतणे आहेत.
सरपंचपदी माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाच्या स्नेहल विशाल पाटील या विजयी झाल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी सिंधू हणमंत जानकर यांच्यावर ३६ मतांनी मात केली. स्नेहल पाटील यांना १७१ तर विरोधी सिंधू जानकर यांना १३५ मते पडली आहेत. सरपंच पदाच्या सर्वसाधारण महिला या जागेसाठी लढत होती. या ठिकाणी एकूण ३०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९३.६० टक्के मतदान झाले होते.
देवनगर ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी दुरंगी लढत झाली. आमदार बाबर गटाचे समर्थक विशाल सुभाष पवार हे विजयी झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी सतीश रमेश पाटोळे यांच्यावर तब्बल १५० मतांनी मात केली आहे. विशाल पवार यांना २८०तर विरोधी सतीश पाटोळे यांना १३०मते पडली आहेत. या ठिकाणी नोटाला ४ मते पडली. उर्वरित सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.