पहिल्याच राज्य क्रीडादिनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक शारीरिक शिक्षण संघटनेची स्थापना

राज्याध्यक्षपदी विकास भुजबळ, महासचिवपदी गणेश शिंदे, जिल्हाध्यक्षपदी नवनाथ कणसे सचिवपदी नवनाथ काशिद

    खंडाळा : सन १९४२ साली पार पडलेल्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक क्रीडा प्रकार रांगड्या मर्दानी कुस्ती खेळात भारत देशाला पहिलेच ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे अवघ्या महाराष्ट्राचा अभिमान, आपल्या सातारा जिल्ह्याची शान, कराड तालुक्यातील गोळेश्वर गावचे पैलवान स्व.खाशाबा जाधव यांचा आज जन्मदिवस १५ जानेवारी, २०२४ मोठ्या थाटामाटात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आजच्याच दिवसापासून महाराष्ट्र राज्य सरकार शिक्षण विभागाने हा दिवस “महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन” म्हणून साजरा केला जावा, असे घोषित केले आहे. आजच्या या सुवर्णकांचन योगदिनी सातारा जिल्हा परिषदेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील अकरा तालुक्यातील क्रीडा शिक्षकांनी एकविचाराने एकत्र येत “महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक शारीरिक शिक्षण संघटना” उपशिक्षणाधिकारी प्राथमिक रविंद्र खंदारे, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन आडे, विशाल कुमठेकर यांच्या उपस्थितीत स्थापन केली. स्व.खाशाबा जाधव यांना दैवत मानून गेले १५ वर्षांपासून प्राथमिक शिक्षणातील क्रीडा क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या या शिक्षकांनी आजअखेर शेकडो मुलांना महत्त्वाकांक्षी अशा क्रीडाप्रबोधिनी उपक्रमात दाखल करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविण्याचे पवित्र कार्य अखंडपणे अविश्रांतरित्या सुरू ठेवले आहे. इथून पुढील काळात ही क्रीडा चळवळ अधिकाधिक वाढीस लागावी यासद्हेतून सदर राज्यस्तरीय संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या विविध पदाधिकारी यांची निवड आज करण्यात आली.

    यामध्ये राज्याध्यक्षपदी क्रीडा मार्गदर्शक विकास भुजबळ, कार्याध्यक्षपदी राजाराम तोरणे, उपाध्यक्षपदी युवराज कणसे, नितीन शिर्के, कोषाध्यक्षपदी शिवाजी निकम, महासचिवपदी गणेश शिंदे यांची तर सहसचिव पदावर श्रीगणेश शेंडे, राज्य नेते म्हणून राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवणारे धोंडिराम धनावडे, कबड्डी, खो-खो खेळांचे राष्ट्रीय पंच रामदास गोळे, सदाशिव कदम, श्रीकृष्ण यादव यांची तर प्रसिध्दी प्रमुख म्हणून सुनिल शेडगे, संदीप पाटोळे, दत्ता नाळे यांची बहुमताने निवड झाली.

    या प्रसंगी सातारा जिल्ह्याचीही कार्यकारिणी घोषित करण्यात आली. सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष म्हणून नवनाथ कणसे यांची, सचिवपदी नवनाथ काशिद यांची, कार्याध्यक्ष म्हणून वैभव चिखले यांची निवड करण्यात आली. उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, राज्य नेते श्रीकृष्ण यादव यांच्या हस्ते सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. संघटना वाढीस लागून राज्यातील अनेक खेळाडू घडविण्यात आपल्या सर्वांचा हातभार लागावा, सिंहाचा वाटा असावा, त्यासाठी जिद्दीने व चिकाटीने प्रयत्न करावेत, असा शुभेच्छा रूपी संदेश त्यांनी दिला. प्रत्येकाने आपापल्या कामाची चुणूक दाखवून खेळ आणि खेळाडूंचा विकास करावा. विद्यार्थ्यांमधील ताकद ओळखून त्यांना सुयोग्य प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचा शुभाशीर्वादही त्यांनी दिला. यावेळी सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुका क्रीडासमन्वयक उपस्थित होते.