इथेनॉल निर्मीतीमुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारणार; उसाला मिळणार चांगला दर

साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊसाला त्यांच्या मनाप्रमाणे भाव मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहेत. मात्र, यापुढील काळात साखरेपासून इथेनॉलची निर्मिती करण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे इथेनॉल प्रकल्प जास्त दिवस चालू ठेवून साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

    रांजणी : साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊसाला त्यांच्या मनाप्रमाणे भाव मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहेत. मात्र, यापुढील काळात साखरेपासून इथेनॉलची निर्मिती करण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे इथेनॉल प्रकल्प जास्त दिवस चालू ठेवून साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या ऊसाला साखर कारखान्यांना चांगला भाव देखील देता येणार आहे.

    वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्यात साखर कारखानदारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. काही ठराविक साखर कारखाने सोडले तर शेतकऱ्यांच्या अपेक्षाप्रमाणे ऊस उत्पादकांना त्यांनी उत्पादित केलेल्या ऊसाला चांगला भाव मिळत नाही. गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळावा ही सातत्याने अपेक्षा राहिलेली आहे, त्या अनुषंगाने अनेकदा आंदोलनेही झाली आहेत. मात्र यापुढील काळात साखरेपासून इथेनॉल निर्मितीला मान्यता मिळाल्याने साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होईल. त्या अनुषंगानेच शेतकऱ्यांच्या उसाला साखर कारखान्यांना देखील चांगला भाव देता येईल.

    उसाच्या मळीबरोबरच उसाचा रस, पाक तसेच निकृष्ट धान्य यापासून इथेनॉल तयार करण्यास आधीपासूनचं मान्यता होती. परंतु आता त्यात साखरेचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र शासनाने त्याकरिता कानपूर येथील राष्ट्रीय ऊस संशोधन संस्थेच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केल्याचे समजते. समितीच्या अहवालातील शिफारशी वरून हा निर्णय घेण्यात आला आहे. इथेनॉलसाठी साखर वळविणाऱ्या प्रकल्पांना सर्व माहितीच्या नोंदी काटेकोरपणे दररोज ठेवण्याचे आदेश देखील केंद्र शासनाने दिलेले आहेत. त्यामध्ये साखरेची आवक, इथेनॉलची निर्मिती पुरवठा आणि साठा याचा समावेश असेल.

    व्याजाचा भुर्दंड घटणार

    साखरेचे साठे पडून राहिल्यास साखर कारखान्याचे पैसे अडकून पडतात. परंतु, इथेनॉल निर्मितीचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे इथेनॉल प्रकल्प ३०० दिवसापर्यंत चालविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पडून असलेली साखर इथेनॉलकडे वळविल्यास साखर कारखान्यांना व्याजाचा बसणारा भुर्दंड कमी होईल. गोदाम व्यवस्थापन खर्च भेटेल त्याचबरोबर इथेनॉल विकून शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी हाती पैसा येईल तसेच इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी देखील मदत होणार आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य वाटतो, असे मत साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केले आहे.