व्‍यापारी आस्‍थापनांच्‍या सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष, आगीच्‍या घटना घडूनही महापालिका प्रशासन उदासीन

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पूर्णानगर येथील हार्डवेअरच्‍या दुकानात आगीच्‍या घटनेत एका कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला होता. त्‍यानंतर शहरातील व्‍यापारी आस्‍थापनांच्‍या सर्वेक्षणाचा विषय चर्चेत आला होता. या निर्णयाला पाच महिन्‍यांचा कालावधी लोटूनही अद्याप व्‍यापारी आस्‍थापनांचे सर्वेक्षण पूर्ण झाले नाही.

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पूर्णानगर येथील हार्डवेअरच्‍या दुकानात आगीच्‍या घटनेत एका कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला होता. त्‍यानंतर शहरातील व्‍यापारी आस्‍थापनांच्‍या सर्वेक्षणाचा विषय चर्चेत आला होता. या निर्णयाला पाच महिन्‍यांचा कालावधी लोटूनही अद्याप व्‍यापारी आस्‍थापनांचे सर्वेक्षण पूर्ण झाले नाही. शहरात पुन्‍हा आगीची घटना घडल्यास त्‍यामध्ये होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    पूर्णानगर येथील एका हार्डवेअरच्या दुकानास ३० ऑगस्ट २०२३ ला आग लागून झोपेत असलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने शहरातील व्यापारी आस्थापना, दुकाने, गोदाम, गॅरेज, बेकरी, हॉटेल, शैक्षणिक संस्था, पेट्रोल पंप, औद्योगिक व वैद्यकीय आस्थापना, मल्टिप्लेक्स, वर्कशॉप, छोटे कारखाने आदींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला.

    जलदगतीने सर्वेक्षण पूर्ण करणे गरजेचे

    शहरात सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. या सर्वेक्षणामध्ये फायर सर्टिफिकेट, उद्योग परवाना, अग्नी प्रतिबंधक यंत्रणा आहे किंवा नाही यांची तपासणी केली जाणार आहे. या यंत्रणांचा आभाव संबंधित आस्‍थापनांमध्ये असल्‍यास योग्य त्‍या सूचना देता येऊ शकतात. तसेच आगीची घटना होऊ नये, यासाठी आधीच खबरदारी घेता येऊ शकते. त्‍यासाठी जलदगतीने सर्वेक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे.

    शहरात सुमारे १ लाखापेक्षा अधिक व्यावसायिक आस्थापना आहेत. आतापर्यंत सुमारे ४३ हजार आस्थापनांचा सर्व्हे झाल्‍याची माहिती आहे. सर्वेक्षणाच्‍या कामाची मुदत ४५ दिवसांची होती. पाच महिने होऊनही अद्याप सर्व आस्थापनांचे सर्वेक्षण रखडलेलेच आहे. महापालिकेच्‍या या संथकाभारामुळे दुर्घटनेत नाहक बळी जाण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे.