
शिवसेना आमदार अपात्रता (Shivsena MLA) प्रकरणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अपात्र झाले तरी ते मुख्यमंत्रिपदावर कायम राहतील, त्यात काहीही अडचण नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिले.
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता (Shivsena MLA) प्रकरणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अपात्र झाले तरी ते मुख्यमंत्रिपदावर कायम राहतील, त्यात काहीही अडचण नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गेल्या जुलै महिन्यांत महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असून, ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राज्यात एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत असताना अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. आमदार अपात्रतेच्या प्रकरणी एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे, असा भाजपचा ‘बी प्लान’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. या सर्व विषयांवर फडणवीस यांनी मुलाखतीत उत्तरे दिली आहेत.
‘प्लान बी’ची गरज नाही
भाजपला ‘प्लान बी’ची गरज नाही. आमच्याकडे फक्त ए प्लान आहे. शिंदेच मुख्यमंत्री राहतील कारण ते अपात्र ठरणार नाहीत त्याची आम्हाला खात्री आहे. अजित पवार आमचा बी प्लान नाहीत. त्यांना उपमुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता तो पूर्ण केला, असेही फडणवीस म्हणाले.
प्रकरण विधानसभाध्यक्षांकडे
आमदार अपात्रता प्रकरणी मे २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. यावर फडणवीस म्हणाले की, ज्याला कोर्टाची ऑर्डर व्यवस्थित समजते किंवा ज्याने निवडणूक आयोगाची ऑर्डर वाचली असेल तो शंभर टक्के सांगेल की एकनाथ शिंदे डिस्क्वॉलिफाय होणार नाहीत. अर्थात हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सुरू आहे. निर्णय काय घ्यायचा हे ते ठरवतील.