
ठाणे : मुंब्र्यातील शिवसेना शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. शिंदे गटाने मुंब्र्यातील शाखा पाडल्यानंतर त्याठिकाणी तात्पुरती नवीन कंटेनर शाखा उभारली आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. ते हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी तिथे शिंदे गटाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही गटाच मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बॅरिकेड्सजवळून घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी भाषण करत शिंदे गटाला इशारा दिला आहे.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “या खोके सरकारने आमची शाखा पाडून तिकडे एक खोका (कंटेनर शाखा) अडवून ठेवला आहे. आमच्या जागेवर अतिक्रमण केलं आहे. तो खोका लवकरात लवकर उचला नाहीतर, आम्ही तो खोका उचलून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही. या शाखेची सगळी कागदपत्रे आमच्याकडे आहेत.”
“अरे नेभळटांनो तुमच्यात हिंमत असेल तर पोलीस बाजुला ठेवा आणि समोर या… दिल्लीच्या कृपेनं आज तुम्ही सत्तेत बसला आहात. कठपुतली आणि बाहुल्यांनो.. तुमच्यात हिंमत नाही. मर्दाची औलाद असाल तर पोलीस बाजुला ठेवा आणि आम्हाला भिडा. आमची तयारी आहे. तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने मी तिकडे जाऊन उभा राहिलो. बघू कुणाच्यात किती हिंमत आहे. माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी यांचे (शिंदे गट) सगळे केस तमाम महाराष्ट्र उपटून टाकल्याशिवाय राहणार नाही,” असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केली. ही शाखा गुंडगिरी करत शिंदे गटाकडून बळकावली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. तर या ठिकाणी शाखेची नव्याने उभारणी केली जात असल्याचा दावा शिंदे गटाने केला. त्याचे भूमिपूजनही पार पडले आहे.