700 नंबर स्कूटरला झाली 30 वर्षे पूर्ण; तासगावात आजही शोरूममध्ये दिसणारी स्कूटर ठरतीये लक्षवेधी

कोणाचे प्राण्यावर, वृक्षावर प्रेम असते तर कोणाचे अन्य कशावर प्रेम असते, कोणाची कशावर मर्जी, प्रेम, असेल सांगता येत नाही. पण एखाद्याचे आपल्या वाहनावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम असेल तर अगदी असेच चित्र तासगावात पाहावयास मिळत आहे.

  तासगाव / मिलिंद पोळ : कोणाचे प्राण्यावर, वृक्षावर प्रेम असते तर कोणाचे अन्य कशावर प्रेम असते, कोणाची कशावर मर्जी, प्रेम, असेल सांगता येत नाही. पण एखाद्याचे आपल्या वाहनावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम असेल तर अगदी असेच चित्र तासगावात पाहावयास मिळत आहे. येथे एका बजाज स्कूटरवर मालक स्वतःपेक्षा जास्त प्रेम करत आहेत. याच ७०० नंबरच्या स्कूटरला आज ३० वर्षे पूर्ण होत आहे.

  तासगावातील सुनिल गायकवाड यांची ही एमएच १० डी ७०० नंबरची बजाज स्कूटर आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी १७ मार्च १९९३ रोजी सांगली येथील अॅटो इंडिया शोरूम येथून ही स्कूटर १९ हजार ५०० रूपयास खरेदी केली. स्कूटर घेतानाच ७०० नंबर घ्यायचा हे ठरवले होते. आणि तसे झालेही.

  या स्कूटरला त्यांनी पहिल्यापासूनच स्वतःपेक्षा जास्त जपली. आजही त्याचे सातत्य पाहावयास मिळत आहे. या स्कूटरला प्रत्येक पाच वर्षांनी नवीन कलर कामांसह इतर कामे केली जात आहेत. ही स्कूटर रितसर आरटीओ ऑफिसकडून पासिंग करून घेऊन सर्व कर २०२५ पर्यंत भरण्यात आलेले आहेत. या स्कूटरवरून सुनिल गायकवाड यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांसह गोवापर्यंत सवारी केली आहे. तर याच स्कूटरवरून त्यांनी तासगाव-सांगली अंतर २० मिनिटांत पार केले. वर्गमित्र रविंद्र माने यांच्यासह त्यांनी अधिकचा प्रवास या स्कूटरवरूनच केला.

  स्कूटरवरून नेत्यांची सवारी…

  या स्कूटरवरून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. आबा पाटील यांच्यासह खासदार संजयकाका पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहितदादा पाटील यांच्यासह अनेक स्कूटरहौशी अधिकाऱ्यांनीही सवारी केली. तर आजही अनेकजण या स्कूटरजवळ थांबून खूपच सुंदर, अशी गाडी ठेवायला नादच लागतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

  स्कूटरची किंमत एक लाख होऊनही दिली नाही

  सुनिल गायकवाड यांनी या स्कूटरला आपल्यापेक्षा जास्त जपले. मी स्वतःवर करत नाही इतके प्रेम या स्कूटरवर करतो, या स्कूटरच्या १०० रूपयांच्या एका पार्टसाठी कोल्हापूर येथे धाव घेतली. या स्कूटरला, गणपती मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या पुणे येथील एका व्यापाऱ्याने एक लाख रूपयास मागणी केली होती. मात्र, आपण दिली नाही, असे स्कूटर मालक सुनिल गायकवाड यांनी सांगितले.