गुजराती भाषिकांनी मराठी भाषा शिकावी, टिकेनतरं आता राज्यपालाकडून मुंबईचं कौतुक

देशातील राष्ट्रीयतेचा भाव वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने आपली सांस्कृतिक ओळख जपताना स्थानिक संस्कृतीशी एकाकार झाले पाहिजे, तसेच महाराष्ट्रात असताना मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

    मुंबई : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी  (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईबद्दल केलेल्या विधानाला आठवडा उलटून गेला आहे. अद्याप त्यांच्या वक्तव्याचा विरोध करण्यात येतच आहे. अशातच आता राज्यपाल मुंबईबद्दल स्तुतीसुमने उधळताना पाहायला मिळाले. मुंबईत महाराष्ट्रात राहत असताना मराठी भाषा शिका असा सल्लाच त्यांनी गुजराती समुदायाला दिला आहे. गुजराती समुदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

    महाराष्ट्रातून गुजराती आणि राजस्थानी निघून गेल्यास मुंबईत पैसा राहणार नाही. तसेच मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) वादात अडकले होते. संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर टिकेची झोड उठत होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राज्यपालांच्या विधानाचा निषेध करत जोरदार आंदोलन केलं होतं. तर, भाजपनेहीराज्यपालांच्या या विधानाशी असहमती दर्शवली होती. आता मात्र, राज्यपालांच्या माफीनाम्यानंतर त्यांनी गुजराती समुदायाच्या एका कार्यक्रमात मराठी भाषा शिकण्याचा सल्ला गुजराती समुदायाल दिला. गुजराती सांस्कृतिक फोरम या मुंबईतील सामाजिक सांस्कृतिक संस्थेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 11 प्रसिद्ध गुजराती व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

    भारत हा सुंदर पुष्पगुच्छाप्रमाणे विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषा इत्यादी बाबतीत स्वतंत्र ओळख असली तरीही सर्व भारतीयांना जोडणारे राष्ट्रीय चारित्र्य समान आहे. देशातील राष्ट्रीयतेचा भाव वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने आपली सांस्कृतिक ओळख जपताना स्थानिक संस्कृतीशी एकाकार झाले पाहिजे, तसेच महाराष्ट्रात असताना मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.