सिनेसृष्टीतील कालेलकर यांची माहिती संकलित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – रविप्रकाश कुलकर्णी

    कणकवली : सिनेसृष्टीचा दरवाजा नवोदित कलाकारांना सहजरित्या उघडत नसतो. त्यासाठी त्यांना धक्के मारून तो उघडावा लागतो. वेंगुर्ले तालुक्यातील मधुसूदन कालेलकर या कलाकाराला सिनेसृष्टीत प्रवेश करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. सिनेसृष्टीतील यश व अपयश कालेलकर यांनी सहजपणे पचवले. मात्र, सिनेसृष्टीतील त्यांच्या प्रवासाचा दस्तऐवज नसल्याने नव्या पिढीला कालेलकर यांचा कार्याची माहिती नाही. ही माहिती या पिढीला मिळावी यासाठी कालेलकर यांच्या बाबत ज्यांनी जी माहिती आहे, ती संकलित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन व्याख्याते रविप्रकाश कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
    नाटककार, कथाकार, पटकथाकार आणि गीतकार मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे येथील आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात रविप्रकाश कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या प्रसंगी श्री. कुलकर्णी बोलत होते. श्री. कुलकर्णी म्हणाले, मधुसूदन कालेलकर यांना प्रेक्षकांची नस माहित असल्याने ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील असे सिनेमांच्या कथाचे लिखाण करायचे. कालेलकर हे प्रतिभेचा वाहता झरा होता. त्यांनी विविध विषयावर केलेले लेखन सहज होते. त्यांचा उमेदपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. कालेलकरांनी आपले सर्वच आयुष्य सिनेसृष्टीसाठी वेचले होते. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणे हा त्यांचा स्वभाव होता. सिनेसृष्टीतील यश व अपयश पचवणे खूप अवघड असते. मात्र, मधुसूदन कालेलकर यांनी सहजपणे पचविले होते, असे त्यांनी सांगितले.
    मधुसूदन कालेलकर यांनी सिनेसृष्टीसाठी दिलेल्या योगदानाची माहिती आजच्या पिढीला नाही. ही माहिती त्यांना मिळण्यासाठी ज्यांनी त्याच्यासोबत काम केले किंवा त्यांनाबद्दल काही माहिती कोणाकडे उपलब्ध असेल तर त्यांनी ती संकलित करण्यासाठी पुढाकार घेत त्या माहितीच्या आधारवर पुस्तक रुपात तयार झाली पाहिजे. कारण त्यांनी आजवर लिलिहलेली नाटकांची पुस्तके वाचनालयात मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच कालेलकरांनी लिहलेल्या नाटकांची सिंधुदुर्गातील कलाकारांनी नाट्यनिर्मिती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    मधुसूदन कालेलकर यांच्या जीवनप्रवासाचा उलघडा रविप्रकाश कुलकर्णी यांनी व्याख्यातानू करतानाच त्यांच्या आयुष्यातील अनेक सुखद व दुःखाचे प्रसंग उपस्थितांसमोर उभे करत ते या प्रसंगांना कशाप्रकारे सामोरे गेले होते हे सांगितले. प्रास्ताविक प्रसाद घाणेकर यांनी केले. व्याख्यान संपल्यानंतर प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना रविप्रकाश कुलकर्णी यांनी समर्पक उत्तरे दिली. व्याख्यान ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.
    तत्पूर्वी वसंतराव सांस्कृतिक आचरेकर प्रतिष्ठानचा ‘रंगवाचा’ या अंकाचे प्रकाशन रविप्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे कार्यवाह अँड एन. आर. देसाई, डॉ. राजेंद्र चव्हाण, खजिनदार धनराज दळवी, सहकार्यवाह राजन राऊळ, कार्यकारिणी सदस्य सीमा कोरगावकर,राजा राजाध्यक्ष, प्रा. अनिल फराकटे, सुनिल पाटील,कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, प्रा. बाळकृष्ण गावडे, मनोज मेस्त्री,आदी उपस्थित होते.