मतदारसंघातील सर्व गरजूंना शिधापत्रिका मिळणार : नीलेश लंके

शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानात मतदारसंघातील सर्व गरजू नागरिकांना शिधापत्रिका (रेशन कार्ड) उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी दिली.

    पारनेर : शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत राबवण्यात येणाऱ्या महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानात मतदारसंघातील सर्व गरजू नागरिकांना शिधापत्रिका (रेशन कार्ड) उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी दिली.

    या उपक्रमासंदर्भात जनजागृती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने गावागावात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत पारनेर येथील संपर्क कार्यालयात गरजूंनी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत असे आवाहन लंके यांनी केले आहे.

    कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

    नवीन शिधापत्रिका, शिधापत्रिकेतील दुरुस्ती, तसेच जीर्ण शिधापत्रिका बदलण्यासाठी अर्ज करावेत अर्जासोबत इतर शिधापत्रिकेतून नाव कमी केल्याचा दाखला, तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा म्हणून घरपट्टी, भाडेकरार, वीजबिल किंवा ग्रामपंचायतीचा ८ अ उतारा, आधारकार्ड, मतदार ओळखपत्राच्या छायांकित प्रती आदी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.