माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्षांसह फुटकळ कार्यकर्त्याच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध‌

माण तालुक्यात बेंगलोर-मुंबई आर्थिक कॉरिडॉर म्हसवडला मंजूर झाला असून त्याचे नोटीफिकेशन झाले असताना राजकीय लोकांनी माणवर अन्याय करत हा काॅरिडाॅर पळवून नेण्याचा घाट घातला होता. या संदर्भात जोरदार हालचालीही झाल्या होत्या.

    म्हसवड  :माण तालुक्यात बेंगलोर-मुंबई आर्थिक कॉरिडॉर म्हसवडला मंजूर झाला असून त्याचे नोटीफिकेशन झाले असताना राजकीय लोकांनी माणवर अन्याय करत हा काॅरिडाॅर पळवून नेण्याचा घाट घातला होता. या संदर्भात जोरदार हालचालीही झाल्या होत्या. मात्र माण पत्रकारांनी याविरोधात आवाज उठवून सर्वांनाच जागे केले. त्यानंतर प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न करून यासंदर्भातील हालचालींना लगाम घातला. या दरम्यान या सर्व घडामोडींबाबत अनभिज्ञ असणाऱ्यांनी राजकीय स्वार्थापोटी म्हसवडचे माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष व काही फुटकळ कार्यकर्त्यांनी पत्रकारांबद्दल बेताल वक्तव्य केले. काॅरिडाॅर संदर्भात योग्य माहिती नसणाऱ्यांनी केलेल्या या वक्तव्याचा माण पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे.

    कोणत्याही पत्रकाराने काॅरिडाॅर होणार म्हणून तिथे जमीन घेतलेली नाही. तरीही माणच्या सर्वसामान्य जनतेसाठी मंजूर झालेला कॉरिडॉर इथेच व्हावा या हेतूने सर्वच पत्रकारांनी वृंताकन केले होते. जर झोपलेल्यांना पत्रकारांनी जागे केले नसते तर आज आपला आर्थिक काॅरिडाॅर दुसरीकडे गेलाच असता. या काॅरिडाॅर हलविण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळविण्यात योगदान दिले यासाठी पत्रकारांचे आभार मानण्याऐवजी राजकीय स्वार्थापोटी काहीजण त्याच पत्रकारांबाबत सोशल मीडियावर बेताल वक्तव्य करत आहेत. अशा प्रवृत्तींचा माण पत्रकार संघातर्फे जाहीर निषेध करण्यात येत असून जोपर्यंत संबंधित माजी नगराध्यक्ष व फुटकळ कार्यकर्ते आपल्या बेताल व्यक्तव्याबद्दल पत्रकारांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या बातम्या व त्यांचे नाव न छापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    यावेळी माण पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप जठार, उपाध्यक्ष शरद देवकुळे, सचिव बापूसाहेब मिसाळ , खजिनदार सचिन मंगरूळे, विठ्ठल काटकर, एल.के.सरतापे, लालासाहेब दडस, रूपेश कदम, महेश जाधव, फिरोज तांबोळी, नवनाथ जगदाळे,विशाल गुंजवटे, उमेश बुधावले, प्रवीण राजे, नवनाथ भिसे आदी पत्रकार उपस्थित होते.

    संबंधितांनी सविस्तर माहिती घेवून खात्री करावी की काॅरिडाॅर हलविण्याच्या हालचाली सुरु होत्या की नव्हत्या. किंबहुना त्या अजून सुरु आहेत. जर जन आंदोलन केले नाही तर काॅरिडाॅर येथून जावू शकते. हा एखाद्या नगरपंचायतीचा, काही कोटींचा विषय नसून काही लाख कोटींचा व पन्नास हजार रोजगाराचा विषय आहे.