माजी नगरसेवकांसह नागरिकांनी केले खड्ड्यात बसून आंदोलन, खड्डे बुजवण्याचे पैसे खड्ड्यात, शिवसेनेचे आरोप

ज्या रस्त्याने गणेश विसर्जन होणार आहे. त्या रस्त्यावर खड्डे आहेत. दुर्गाडीच्या चौकात एवढे खड्डे आहेत. आत्ता ही वेळ आली की, याच्यावरती लोक न्याय करतील असे सांगितले आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवलीत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. खड्डे भरण्याचे आश्वासन प्रशासनाकडून दिले जात असले तरी खड्डे भरले जात नाही. कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाने महिला नागरीकांसह खड्ड्यात बसून खड्ड्यांमुळे नागरीकांना किती त्रास आहे. हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. खड्डे बुजविण्यावरचे पैसे खड्ड्यात गेले आतातरी लोक न्याय करतील असा इशारा माजी नगरसेवक संजय पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

    केडीएमसी प्रशासन आणि आयुक्तांनी गणेशोत्सवापूर्वी खडडे भरले जातील असे आश्वासन दिले होते खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविले होते ते पुन्हा उखडले गेले. अनेक ठिकाणी खड्डे बुजविले गेले नाही. कल्याण पूर्वेत खराब रस्ता असल्याने भाजप आमदार गणपत गायकवाड यांना स्वखर्चातून खड्डे भरावे लागले. आपले गणपती खड्ड्यातून गेले. तसेच सत्ताधाऱ्यांना येत्या निवडणूकीत खड्ड्यात टाका असे आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी केले. आता शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाने कल्याण पश्चिमेत चिकणघर परिसरात खड्डयात बसून महिला नागरीकांसह आंदोलन केले आहे.

    संजय पाटील यांचे म्हणणे आहे की, कल्याण डोंबिवली महापालिकेचे खड्डे बुजविण्याचे पैसे खड्यात गेले. १८० कोटी रुपये दरवर्षी खड्ड्यात टाकले जातात. ते पैसे पाण्यात जातात. आमच्या महापालिकेतील आयुक्त फक्त बोलतात. तीन दिवसात कल्याणमधील सगळे रस्ते खड्डेमुक्त होणार अशी वल्गना त्यांनी केली होती. ज्या रस्त्याने गणेश विसर्जन होणार आहे. त्या रस्त्यावर खड्डे आहेत. दुर्गाडीच्या चौकात एवढे खड्डे आहेत. आत्ता ही वेळ आली की, याच्यावरती लोक न्याय करतील असे सांगितले आहे.

    तर चिकनघर परिसरात राहणारी महिला या आंदोलनात सहभागी झाली होती. अर्चना संदीप घारे या भागात राहतात. त्याची मुलगी याच परिसरातील नामांकित शाळेत शिकते. त्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी शाळेत जातात. खड्ड्यावर चिखल साचल्याने चिखल उडून त्यांचे कपडे खराब होत असतात. एके दिवशी मुलीचे कपडे चिखलाने खराब झाल्याने त्यांच्या मुलीला शाळेने वर्गात घेतले नाही. आत्ता त्यांनी त्यांच्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी रिक्षा केली आहे.