कणकवली गार्बेज डेपोचा रस्ता उखडल्याने माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आक्रमक

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी रस्ता उखडणारा ट्रेलर रोखला, नगरपंचायतचे झालेल्या नुकसानीची भरपाई होत नाही तोपर्यंत ट्रेलर हलवू देणार नाही.

    कणकवली नगरपंचायत गार्बेज डेपो मधील कचरा प्रकल्पाच्या कामाकरिता आणलेल्या पोकलॅण्ड टाईपच्या बायोमायनिंग मशीन गार्बेज डेपो वरील डांबरी रस्त्यावरून नेल्याने या रस्त्याची पूर्णता वाताहात झाली. ही बाब माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह त्यांच्या सहकारी माजी नगरसेवकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आज ही मशीन मुंडेश्वर मैदानावर रोखून धरली. जोपर्यंत नगरपंचायतच्या नुकसानी बाबत नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांशी लेखी कागद होत नाही. तोपर्यंत मशीन येथून हलू देणार नाही असा इशारा श्री. नलावडे व हर्णे यांनी दिला.

    दरम्यान यानंतर संबंधित मशीन चालकाने मशीन थांबवतो अशी ग्वाही दिली. याबाबत माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष यांनी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करत याबाबत संबंधित ठेकेदाराला बोलावून घेत नगरपंचायतच्या नुकसानीची भरपाई करून घ्या अशी मागणी केली. कणकवली गार्बेज डेपोवर कचरा प्रकल्पाकरिता पोकलँड टाईप रोलिंग चेन असलेली बायोमायनिंग मशीन आणण्यात आली होती. मुडेश्वर मैदानापर्यत ही मशीन ट्रेलरमधून गार्बेज डेपो पर्यत नेण्याची गरज होती. मात्र ट्रेलर या गार्बेज डेपोपर्यंत जात नसल्याने या पोकलेन टाईप बायोमायनिंग मशीन रस्त्यावरूनच नेण्यात आली. या मशीनच्या चाकांना असलेल्या लोखंडी बेल्टमुळे संपूर्ण डांबरी रस्ता उखडून गेला व यात नगरपंचायतचे मोठे नुकसान झाले.

    दोन वर्षांपूर्वीच हा रस्ता डांबरीकरण करण्यात आला होता. ही बाब निदर्शनास येतात आज माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह माजी नगरसेवक बंडू गांगण, किशोर राणे, अभिजीत मुसळे आदींनी या रस्त्याची पाहणी केली व या बायोमायनिंग ट्रेलर घेऊन जाणाऱ्या चालकाला मुडेश्वर मैदानावर रोखून धरले. जोपर्यंत कागदोपत्री नुकसानी बाबत आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत मशीन येथून हलवायची नाही असा इशारा देखील चालकाला देण्यात आला. याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून, कणकवली नगरपंचायतचे पर्यायाने कणकवली शहर वासियांचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही अशी देखील माहिती श्री. नलावडे यांनी दिली.

    संबंधित ठेकेदाराने मनमानी पद्धतीने रस्त्याचे नुकसान केले असून यामुळे येत्या काळात रस्त्याची दुरावस्था होणार असल्याने हा रस्ता सुस्थितीत करण्याबाबत मुख्याधिकारी यांनी प्रयत्न करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. व तशा सूचना देखील देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.