मंत्रालयातच लागले माजी मंत्र्यांच्या गाडीला टोचण

मंत्रालय परिसरात वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या आणि नेमून दिलेल्या जागेत वाहने पार्क न करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस कारवाई करत असून या कारवाईचा फटका आज चक्क एका माजी मंत्र्याना बसला.

    मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच मंत्रालयातील मंत्र्यांना भेटायला येणाऱ्या नागरिकांची, माजी आमदार, माजी मंत्री, पदाधिकारी यांची गर्दी वाढू लागली आहे. यासोबतच माजी मंत्री, माजी आमदार, पदाधिकारी आणि व्हीव्हीआयपी यांच्या गाड्यांची वर्दळ वाढल्यामुळे मंत्रालयातील वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. मंत्रालय परिसरात वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या आणि नेमून दिलेल्या जागेत वाहने पार्क न करणाऱ्यांवर वाहतूक पोलीस कारवाई करत असून या कारवाईचा फटका आज चक्क एका माजी मंत्र्याना बसला.

    मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांना भेटायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी आणि नंतरचे दोन दिवस मंत्रालयात अतोनात गर्दी होत असते. माजी मंत्री, आजी माजी आमदार, अधिकारी, व्हीआयपी यांच्या गाड्यांमुळे मंत्रालयात गाड्या पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध नसते. काही वेळा तर मंत्र्यांच्या गाड्या पार्किंग करण्यासही जागा नसते.

    गाड्या पार्किंग करण्यावरून अनेकदा ड्रायव्हर यांची एकमेकांशी हमरीतुमरी होते. यावर पर्याय म्हणून वाहतूक पोलिसांनी आमदार, आजी माजी आमदार, माजी मंत्री यांच्या गाड्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. तर, विद्यमान मंत्र्यांच्या गाड्यांसाठी मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ विशिष्ट जागेची व्यवस्था केली आहे. मात्र, विद्यमान मंत्र्यांच्या जागेत माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या वाहकाने गाडी पार्किंग केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना राज्यमंत्री होते. मात्र त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना विधान परिषदेत निवडून पाठविले आहे.

    याच जागेत माजी महसूल राज्य मंत्री सुरेश धस यांची गाडी पार्किंग करण्यात आली होती. धस यांच्या गाडीवर विधान परिषद आमदाराचा लोगो असला तरी मंत्र्याच्या गाडीवर असलेला विशिष्ट्य अक्षरातील ‘एम’ दिसत नसल्याने वाहतूक पोलिसांनी या गाडीलाच टोचण लावले. आमदार सुरेश धस यांचे ड्राइव्हर आणि सुरक्षारक्षक हे गाडीजवळ आले असता त्यांना गाडीला टोचणी लावण्यात आल्याचे दिसून आले. मग त्यांनी धावपळ करून वाहतूक अधिकाऱ्याची भेट घेत हे टोचण काढले. मात्र, दरम्यान त्यांची अधिकाऱ्यांनी चांगलीच कानउघडणी केली.