माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणी वाढणार? काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या बांधकामाविरोधात तक्रार, वाचा सविस्तर रिपोर्ट

  पुणे : भाजप नेते व माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काकडे यांच्या मालकीच्या कर्वेनगर येथील काकडे पॅलेस मंगल कार्यालयाचे बांधकाम बेकायदेशीररित्या करण्यात आल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. याप्रकरणी मंगळवारी तक्रारदार दीपक कदम यांनी नव्याने निवेदन देत दोन दिवसांत काकडे पॅलेसच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, महापालिकेसमोर आंदोलनाचा इशारा तक्रारदार कदम यांनी दिला आहे.

  संजय काकडे यांच्या अडचणींमध्ये होणार वाढ
  बैंकांच्या कर्जप्रकरणी अगोदरच अडचणीत सापडलेल्या माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. काकडे यांच्या मालकीच्या कर्वेनगर येथील काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या बांधकामासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
  अनधिकृत बांधकामासंदर्भात तक्रार दाखल

  तक्रारदार कदम यांनी आॅगस्ट महिन्यात शहर अभियंता आणि अनधिकृत बांधकाम विभाग यांच्याकडे अनधिकृत बांधकामासंदर्भात तक्रार दाखल केली होती. सदर मिळकतीला केवळ तीन मजल्यांची परवानगी असताना त्याठिकाणी अनाधिकृत रित्या चौथ्या मजल्याचे बांधकाम केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  तर दोन दिवसांत अनधिकृत बांधकाम पाडावे
  याप्रकरणी तक्रारदार दीपक कदम यांनी मंगळवारी निवेदन देत संबंधित कामाची तपासणी करुन जर अधिकृत असेल तर माहिती अधिकारात माहिती द्यावी, अन्यथा बेकायदेशीर बांधकाम असेल तर दोन दिवसांत अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
  प्रशासनाकडून वेळकाढू भूमिका

  यापूर्वी तक्रारदार यांनी सदर मिळकतीच्या बांधकाम परवानगी संदर्भातील कागदपत्रे माहिती अधिकार अंतर्गत मागविली होती. दरम्यान, अद्याप पालिका प्रशासनाकडून अर्जदारांना माहिती देण्यात आली नाही. यामध्ये प्रशासनाकडून वेळकाढू भूमिका घेतली जात असून माहिती देण्यात टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप कदम यांनी केला होता.

  ..अन्यथा महापालिका भवनासमोर आंदोलन करणार
  सदर मिळकतीचे बांधकाम बेकायदेशीररित्या केले असल्यास दोन दिवसांत सदर बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणी दीपक कदम यांनी केली आहे. अन्यथा महापालिका भवनासमोर आंदोलनाला बसण्याचा इशारा कदम यांनी दिला आहे. सर्वसामान्य पुणेकरांच्या अनधिकृत बांधकामांवर मनपा प्रशासन तत्काळ कारवाई करते. तर राजकीय नेत्यांच्या बेकायदेशीर बांधकामांवर सोईस्कर दुर्लक्ष केले जाते, असा आरोपही कदम यांनी केला.