एकनाथ शिंदेच्या बंडाने नवी मुंबई शिवसैनिकांत खळबळ

महाविकास आघाडी (MVA) म्हणून स्थानिक पातळीवर (Local Level) मनांची जुळवाजुळव करणारे तिन्ही पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते चिंतेत असून येत्या निवडणुकांत हाता-तोंडाशी आलेला विजयाचा घास हिरवला जाण्याची शक्यता आहे.

  नवी मुंबई/सिद्धेश प्रधान : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप (Political Earthquake) घडवलेल्याने त्याचे हादरे ठाणे (Thane) जिल्ह्यासह नवी मुंबई (Navi Mumbai) शिवसेनेलादेखील हादरे बसण्याची शक्यता आहे. नवी मुंबईची कमान जरी उपनेते विजय नाहटा (Vijay Nahata) यांच्याकडे असली तरी कमांड पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्याचा नवी मुंबई शिवसेनेलादेखील फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी (MVA) म्हणून स्थानिक पातळीवर (Local Level) मनांची जुळवाजुळव करणारे तिन्ही पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते चिंतेत असून येत्या निवडणुकांत हाता-तोंडाशी आलेला विजयाचा घास हिरवला जाण्याची शक्यता आहे.

  नवी मुंबईत आजतागायत माजी मंत्री गणेश नाईकांचे (Ganesh Naik) वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे २९ वर्ष नवी मुंबई पालिकेवर विरोधकांना आपले वर्चस्व एकदाही गाजवता आलेले नाही. राज्यात मविआचे सरकार स्थापन झाल्यावर त्याचे पडसाद राज्यातील सर्वच पालिकांमध्ये उमटले. नवी मुंबईतदेखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपला महापौर बसवण्याची स्वप्न पाहत आहे. त्यादृष्टीने ‘माविआ’ने राजकारणाचे पावले उचलत आहे. अगदी आगामी निवडणुकांकारिता प्रभाग रचनांवरदेखील ‘माविआ’चे वर्चस्व दिसून येते. त्यास भाजपाने हरकती नोंदवून जोरदार विरोध केला असला तरी त्यात तसुभरदेखील फरक पडलेला नाही. यंदा सत्ता खेचून आणायचीच अशी आखणी जवळपास झालेली असतानाच एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भूकंपाने नवी मुंबई शिवसेनेत फटाफूट होण्याची शक्यता आहे.

  नवी मुंबई असो वा ठाणे किंवा लगतचा भाग ‘मातोश्री’कडून (Matoshree) कधीही वैयक्तिकरित्या या शहरांमध्ये लक्ष घालण्याची तसदी घेतली गेलेली नाही. मुंबईवर अतोनात प्रेम करताना दुसरे जिल्हे मात्र स्थानिक नेत्यांवर सोपवून मातोश्री कायम निर्धास्त राहिली. त्याचे शल्य कायम मुंबईबाहेरील शिवसैनिकांना बोचत राहिले. त्याचाच परिणाम म्हणून दिवंगत आनंद दिघे, गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेतेच नवी मुंबई ठाण्यातील शिवसैनिकांसाठी ‘प्रती मातोश्री’च ठरत होते. त्यामुळे येथील शिवसैनिकांमध्ये स्थानिक नेत्यांबद्दल आपुलकी कमालीची दिसून येते. गणेश नाईक यांनी देखील शिवसेना सोडल्यावर सेनेला खिंडार पडले होते. मात्र त्यावेळी आनंद दिघे हयात असल्याने त्यांनी हे बंड सावरून घेतले. आताही नवी मुंबईतील पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक असून त्याचा परिणाम एकनाथ शिंदे यांच्या राजकीय घोषणेनंतर नवी मुंबईत पाहण्यास मिळणार आहे.

  सर्वाधिक फटका ऐरोली मतदार संघात?
  एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांचा सर्वाधिक फटका नवी मुंबईत ऐरोली मतदार संघात बसू शकतो. त्यामुळे सध्या मातोश्रीच्या जवळ असलेले शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्यासमोर शिवसेना फुटीपासून सावरण्याचे मोठे आव्हान असणार आहे. यासह माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांच्या भूमिकेकडेदेखील नवी मुंबईकरांचे आहे.

  नाईकांना सोडून शिंदेंची कास धरणाऱ्यांचे पुढे काय?
  आमदार गणेश नाईक यांची कास सोडून अनेक नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्यातील सत्तेचे आणि स्थानिक गणित ओळखत या नगरसेवकांनी सेनेची साथ धरली आहे. त्यामुळे मंगळवारच्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्यास शिंदे समर्थक नगरसेवक काय भूमिका घेणार, हे नगरसेवक पुन्हा भाजपचे पर्यायाने गणेश नाईकांचे मांडलिकत्व स्वीकारणार की शिवसेनेत राहणे पसंत करणार, हे पाहावे लागेल.