
‘महाज्योती’च्या परीक्षेतील भोंगळपणा पुन्हा एकदा पुढे आला आहे. ही बाब लक्षात येताच ‘महाज्योती’मार्फत ही गुणवत्ता यादी वेबसाइटवरून काढून घेण्यात आली आहे.
पुणे : एमपीएससी प्रशिक्षण चाळणी परीक्षेचा निकाल ‘महाज्योती’मार्फत जाहीर करण्यात आला असून, या परीक्षेत एका विद्यार्थ्याला २०० पैकी २२० गुण मिळाल्याचे गुणवत्ता यादीमध्ये जाहीर करण्यात आले होते. २०० पेक्षा अधिक गुण मिळविणारे अनेक विद्यार्थी आहेत, ही बाब लक्षात येताच ‘महाज्योती’मार्फत ही गुणवत्ता यादी वेबसाइटवरून काढून घेण्यात आली आहे. तसेच महाज्योतीकडून स्पष्टीकरण दिलं आहे.
ओबीसी प्रवर्गातील एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान येणाऱ्या खर्चात ‘महाज्योती’मार्फत अर्थसहाय्य केले जाते. यासाठी एमपीएससी प्रशिक्षण चाळणी परीक्षा घेऊन त्यातील गुणांआधारे हे सहाय्य केले जाते. यंदा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या या परीक्षेचा निकाल ‘महाज्योती’मार्फत नुकताच जाहीर करण्यात आला. २०० मार्कांसाठी घेण्यात आलेली ही परीक्षा राज्यातील १९ हजार १७३ विद्यार्थ्यांनी दिली होती. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना २०० पेक्षा अधिक मार्क मिळाले आहेत.
महाज्योतीकडून निकालाबाबत स्पष्टीकरण
महाज्योतिकडून एमपीएससीसाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षाचा निकाल लावण्यात आला होता. परंतु नॉर्मलाझीशन केल्यामुळे २०० पेक्षा जास्त गुण दिसून येत होते. आत्ता सुधारित निकाल प्रसिद्ध करताना प्रारूप निकाल प्रसिद्ध करता येईल. त्यावर विधार्थ्यांचे आक्षेप मागवण्यात येतील व संपूर्ण प्रकिया पूर्ण करूनच अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल असं महाज्योतीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांनी कोणतीही शंका बाळगू नये, असे आवाहन महाज्योतिकडून करण्यात आले आहे.
काल महाज्योती मार्फत घेण्यात येणाऱ्या एमपीएससी प्रशिक्षण चाळणी परीक्षा चा निकाल जाहीर झाला. यामध्यें 200 पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून आले यामुळे विध्यार्थी वर्गात संभ्रम निर्माण झाला होता. आज महाज्योती ने स्पष्टीकरण दिल्यामुळे विध्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे.
- महेश घरबुडे (कार्याध्यक्ष. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती)