संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

आयटी पार्क हिंजवडी फेज १ मधील ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधीत "ॲकॉर्ड ऑटोकॅम्प कंपनी''तील गॅस भट्टीमध्ये स्फोट झाल्याची घटना मंगळवारी (२६ डिसेंबर) सकाळी अकरा वाजता घडली. या स्फोटात गॅस भट्टी भागात काम करणारे २० कामगार गंभीर जखमी झाले.

  पिंपरी : आयटी पार्क हिंजवडी फेज १ मधील ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधीत “ॲकॉर्ड ऑटोकॅम्प कंपनी”तील गॅस भट्टीमध्ये स्फोट झाल्याची घटना मंगळवारी (२६ डिसेंबर) सकाळी अकरा वाजता घडली. या स्फोटात गॅस भट्टी भागात काम करणारे २० कामगार गंभीर जखमी झाले. जखमी कामगारांपैकी १५ कामगारांवर उपचार सुरू असून, पाच कामगारांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

  ॲकॉर्ड ऑटोकॅम्प कंपनीत काम करणारे सागर लक्ष्मण सोलसे (३५, रा. घोटावडे) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याददिली आहे. त्यानुसार ॲकॉर्ड ऑटोकॅम्प कंपनीचे मालक प्रशासन तसेच मेंटेनन्सचे काम पाहणाऱ्या इतर व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी याबाबत माहिती दिली. सागर आणि त्यांचे इतर १९ कामगार हे कंपनीच्या ऑटोमोबाईल पार्ट्स गॅस भट्टीच्या ओव्हन मशीन मध्ये कोटिंगचे काम करत होते. त्यावेळी गॅस भट्टीमध्ये अचानक स्फोट झाला. या स्फोटात गॅस भट्टीमधील कोटिंग करण्यासाठी ठेवलेली पावडर आणि पार्ट कामगारांच्या अंगावर उडाले. त्यामध्ये २० कामगार गंभीर जखमी झाले. गॅस भट्टीची देखभाल न केल्याने हा प्रकार घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

  या भट्टीत ठराविक तापमान निश्चित केले जायचे. निश्चित तापमान वाढले की ते कालांतराने ऑटो मोडवर कमी होत जायचे. ठराविक तापमान वाढले की ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधीत पार्टवर कोटिंग केले जायचे. मंगळवारी ठराविक तापमान वाढल्यावर ते कमी झालेनाही आणि वाफेचा फुगवटा तयार झाला. परिणामी भट्टीची दारे तुटून वाफ बाहेर आली आणि कामगार होरपळले. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

  कंपनीने घटना लपविली…

  कंपनीच्या गॅस भट्टीत स्फोट झाल्याची घटना मंगळवारी (२६ डिसेंबर) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली. धक्कादायक बाब म्हणजे एवढी मोठी घटना घडल्यावर कंपनीने ही माहिती पोलिसांना दिली नाही. सकाळी घडलेली घटना पोलिसांना अन्य लोकांकडून सायंकाळी समजली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया केली.

  शहरातील तिसरी मोठी घटना

  पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही महिन्यांत तीन मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. ताथवडे येथील जे एस पी एम कॉलेज च्या परिसरात अनधिकृतपणे गॅस सिलेंडर मध्ये गॅस भरताना मोठा स्फोट झाला होता. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीअनेक वाहने जळाली होती. त्यानंतर तळवडे येथे शोभेचे फटाके बनविणाऱ्या कंपनीत स्फोट होऊन १४ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता हिंजवडी पार्कमध्ये एका कंपनीच्या गॅस भट्टीमध्ये स्फोट होऊन २० कामगार जखमी झाले आहेत. शहरातील वाढत्या आगीच्या घटनामुळे महापालिकेने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज भासत आहे.