
कोथरूड भागात वेगेवगेळ्या कंपनीच्या एलपीजी गॅस सिलिंडरमधून रिकाम्या सिलिंडमध्ये गॅस भरत असताना गॅस गळती होऊन भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. यात एक जण जखमी झाला आहे.
पुणे : कोथरूड भागात वेगेवगेळ्या कंपनीच्या एलपीजी गॅस सिलिंडरमधून रिकाम्या सिलिंडमध्ये गॅस भरत असताना गॅस गळती होऊन भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. यात एक जण जखमी झाला आहे. ही घटना कोथरुडमधील ओम गॅस एजन्सी येथे मंगळवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली आहे.
तत्पुर्वी पिंपरी-चिंचवड परिसरात नुकतीच रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना गॅस लिक होऊन स्फोट झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात दुकानाचे चालक विष्णुकांत धनाजी चांडेश्वर (वय ४५ रा. काळेवाडी, पुणे), कामगार आशिष रमेश यादव (वय १९ रा. जयभवानी नगर, कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत कामगार आशिष यादव हा जखमी झाला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी वैभव कुंडलिक शितकाल (वय ३४) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानाचे चालक विष्णुकांत चांडेश्वर व कामगार आशिष यादव हे बेकायदेशीरपणे विविध कंपन्यांच्या भरलेल्या जीवनावश्यक घरगुती वापराचा स्वयंपाकाचा गॅस स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी रिकाम्या टाकीत पाईपद्वारे भरत होते. गॅस रिकाम्या लहान टाकीत भरत असताना त्याची गळती झाली. यामुळे स्फोट झाला. या स्फोटामुळे आग लागली. यात कामगार यादव हा जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दुकान चालक व जखमी कामागार यांच्या गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक आडगळे करत आहेत.