भरधाव एक्सप्रेस रेल्वेला JCB चा कट; काळजाचा ठोका चुकला, पण अपघात टळला

भरधाव वेगाने जाणार्‍या कामाख्या एक्सप्रेसला रेल्वेचे काम करणार्‍या जेसीबीचा कट लागल्याची घटना परधाडे रेल्वे स्थानकाजवळ घडली. यामुळे मोठ्या हानीची शक्यता असतानाही सुदैवाने अपघात टळला. मात्र काही सेकंदाच्या या घटनमुळे गाडीतील प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला(Express Train Hits JCB).

    जळगाव : भरधाव वेगाने जाणार्‍या कामाख्या एक्सप्रेसला रेल्वेचे काम करणार्‍या जेसीबीचा कट लागल्याची घटना परधाडे रेल्वे स्थानकाजवळ घडली. यामुळे मोठ्या हानीची शक्यता असतानाही सुदैवाने अपघात टळला. मात्र काही सेकंदाच्या या घटनमुळे गाडीतील प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला(Express Train Hits JCB).

    कामाख्याहुन लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणारी कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेस (क्रं. १२५२० अप) ही जळगांव स्थानकावरुन ४ जुन रोजी सकाळी १० वाजुन २३ मिनिटांनी रवाना झाली. दरम्यान पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकानजीक (रेल्वे कि. मी. क्रंमाक ३७९ / ८) रेल्वे लाईन लगत तिसर्‍या रेल्वे लाईनच्या रुळा खाली बसविण्यात येणारे सिमेंटचे ब्लॉक जे. सी. बी. च्या सहाय्याने ठेवण्याचे काम सुरू होते. यावेळी कामाख्या एक्स्प्रेस भरधाव वेगाने जात असतांना या जे. बी. सी. चा पुढील भाग कामाख्या एक्स्प्रेसच्या लोकोपायलटच्या निदर्शनास येताच लोकोपायलट ने जोरात हॉर्न वाजवुन सूचना दिला. मात्र याकडे जेसीबी चालकाने दुर्लक्ष केले.

    यामुळे भरधाव वेगाने येणार्‍या कामाख्या एक्स्प्रेसच्या इंजिनच्या डाव्या बाजुच्या चाकाजवळ जेसीबीचा पुढील भाग धडकला. यावेळी मोठा आवाज झाल्याने काहीवेळ प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान एक्स्प्रेसने जेसीबीला काही अंतरावर फरफटत नेले.

    लोकोपायटलने गाडी कंट्रोल करत थांबवली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नसली तरी पुढील होणारा अनर्थ मात्र निश्चित टळला. कामाख्या एक्स्प्रेसला घटनास्थळी सुमारे एक तास खोळंबा झाल्यानंतर जेसीबी बाजुला हटविल्यानंतर धीम्या गतीने पाचोरा रेल्वे स्थानकावर दुपारी १२ वाजुन ५३ मिनिटांनी प्लॅट फार्म क्रमांक १ वरील लुप लाईनलावर थांबविण्यात येवुन भुसावळ येथुन दुसर्‍या इंजिनला पाचारण करण्यात आले. भुसावळहुन इंजिन आल्यानंतर क्षतीग्रस्त झालेले इंजिन बाजुला करुन कामाख्या एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दिशेने रवाना करण्यात आली.

    या अपघातामुळे कामाख्या एक्सप्रेसमधील प्रवाशांना काही काळ समजेनासे झाले. मात्र अपघात टळल्याने त्यांनी सुटकेचा श्‍वास सोडला.यावेळी पाचोरा रेल्वे स्टेशनचे स्टेशन प्रंबधक एस. एस. टी. जाधव यांनी घटनेची माहिती मिळताच पाचोरा रेल्वे स्थानकावर गाडी पुढिल प्रवासासाठी तात्काळ मार्गस्थ केली.