साजिद मुल्ला यांच्यासह पाच माजी जिल्हाध्यक्षांची हाकलपट्टी; बळीराजा शेतकरी संघटनेची घोषणा

बळीराजा शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्यासह पंढरपूरचे प्रदेश युवा अध्यक्ष नितीन बागल, सांगलीचे माजी जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष रामदास खराडे, पुण्याचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश गणगे यांनी संघटनेच्या ध्येय धोरणा विरुद्ध जाऊन संघटनेत फूट पाडण्यासह बंडखोरी केली आहे. या पार्श्वभूमीवर बळीराजा शेतकरी संघटनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती संघटनेचे संस्थापक व केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील व प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

  कराड : बळीराजा शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्यासह पंढरपूरचे प्रदेश युवा अध्यक्ष नितीन बागल, सांगलीचे माजी जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष रामदास खराडे, पुण्याचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश गणगे यांनी संघटनेच्या ध्येय धोरणा विरुद्ध जाऊन संघटनेत फूट पाडण्यासह बंडखोरी केली आहे. या पार्श्वभूमीवर बळीराजा शेतकरी संघटनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती संघटनेचे संस्थापक व केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील व प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

  प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, बळीराजा शेतकरी संघटनेची स्थापना पंढरपूर येथे पांडुरंगाच्या साक्षीने दि. ९ नोव्हेंबर २०१४ रोजी झाली आहे. कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या उदात्य व प्रमुख उद्देशाने संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. संघटना स्थापनेच्या कार्यक्रमात पंढरपूर व सोलापूरसह राज्यातील हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी सामील झालेले होते.

  कालांतराने आपल्या स्वार्थापोटी बरेच पदाधिकारी संघटना सोडून गेले. मात्र संघटना डगमगली नाही. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालत आज अखेर संघटनेचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे.

  शेतकऱ्याच्या हितासाठी संघटना नेहमीच आक्रमक राहिली आहे. निवेदने, धरणे आंदोलन, आमरण उपोषण, रास्तारोको, मोर्चा आदी लोकशाहीची आयुदे वापरून शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी लढा सुरूच आहे. बळीराजा शेतकरी संघटना प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर उभी आहे. आजपर्यंत संघटनेवर कोणताही आरोप झालेला नाही. परंतु अलीकडच्या काळात संघटनेत नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनी संघटनेत गटबाजी करून संघटना तोडण्याचा प्रयत्न सुरू केलेल्याचे दिसून आले आहे. याची संघटनेने गंभीर दखल घेतली असून पंढरपूर या संघटना स्थापनेच्या ठिकाणी बैठक घेऊन गटबाजी करणाऱ्या व बंडखोर कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.

  त्यानुसार नितीन बागल (पंढरपूर), उमेश देशमुख (सांगली), रामदास खराडे (सोलापूर), रमेश गणगे (पुणे) व साजिद मुल्ला(सातारा) यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. भविष्यात यांचा बळीराजा शेतकरी संघटनेशी कोणताही संबंध राहणार नाही, याची नोंद प्रशासनातील सर्व घटकांनी घ्यावी, असे आवाहन पंजाबराव पाटील व बी. जी.पाटील यांनी केले आहे.

  बळीराजा शेतकरी संघटना ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. या संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विविध आंदोलने करून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. परंतु संघटनेमध्ये राहून स्व-स्वार्थासाठी संघटनेत दुही निर्माण करून बंडखोरी करणारे साताराचे माजी जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्यासह पाच जणांची संघटनेने हाकलपट्टी केली आहे. या लोकांचा बळीराजा शेतकरी संघटनेशी भविष्यात कोणताही संबंध असणार नाही. याची नोंद प्रशासनातील सर्व घटकांसह शेतकरी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधवांनी घ्यावी.

  पंजाबराव पाटील (बळीराजा शेतकरी संघटना, केंद्रीय अध्यक्ष)