झेडपीच्या योजना वंचितांपर्यंत पोहोचवा; सीईओ मनिषा आव्हाळे यांचं आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी देशाच्या प्रगतीचा, विकासाचा मार्ग दाखविला. व्यक्ती, प्रतिमेची पूजा न करता समाजाला पुढे नेणारे विचार आचरणात आणा असा मंत्र त्यांनी दिला.

    सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी देशाच्या प्रगतीचा, विकासाचा मार्ग दाखविला. व्यक्ती, प्रतिमेची पूजा न करता समाजाला पुढे नेणारे विचार आचरणात आणा असा मंत्र त्यांनी दिला. त्यांच्या विचारांची आठवण ठेवून कर्मचाऱ्यांनी झेडपीच्या योजना वंचितापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे (Manisha Awhale) यांनी केले.

    महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त झेडपी प्रशासनातर्फे आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, इशादीन शेळकंदे, अमोल जाधव, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, संतोष कुलकर्णी, दिनेश महिद्रकर, कृषी अधिकारी वाघमोडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, महिला व बालकल्याण अधिकारी संतोष मिरकले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रविण पाटील व सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे म्हणाल्या की, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सातत्याने आठवावेत व त्याचे आचरण करायला शिकले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘उठा, जागे व्हा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा मंत्र दिला. समाजाला पुढे न्यायचे असेल तर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. आपल्याला प्रगती साधायची असेल तर त्यांच्या विचारांवर पाऊल ठेवून वाटचाल करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले.