म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; नागरीकांना ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करता येणार

पुण्यात म्हाडाच्या घरांसाठी २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. आतापर्यत ३२ हजार जणांचे अर्ज दाखल झाले आहेत.

  पुणे : म्हाडाने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पाच हजार ८६३ सदनिकांसाठी काढलेल्या सोडतीमध्ये आतापर्यंत ३२ हजार नागरीकांनी अर्ज केले आहेत. दरम्यान, गणेशोत्सव व कार्यालयीन सुट्टींमुळे अधिवास प्रमाणपत्र अथवा इतर आनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करण्यास नागरिकांना येत असलेली अडचण लक्षात घेऊन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यामुळे नागरीकांना २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

  म्हाडाचे पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत गुरुवार (ता.२८) सप्टेंबरपर्यंत होती. गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, पंतप्रधान आवास योजनेतील ४३१ सदनिका, १५ टक्के सामाजिक गृहयोजनेतील ३४४ सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील दोन हजार ४४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत दोन हजार ४४५ सदनिका, अशा एकूण ५ हजार ८६३ सदनिकांसाठी सोडत जाहीर केली होती. त्यासाठी ५ सप्टेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

  पाटील म्हणाले, ‘‘अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तसेच ज्या आरक्षण असणाऱ्या वर्गातून अर्ज करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र, असे पुरावे ऑनलाइन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक केले आहे.

  गणेशोत्सवाच्या काळात नागरिक बाहेरगावी गेले असल्याने तसेच शासकीय सुट्टी असल्याने नागरिकांना प्रमाणपत्रे मिळण्यास विलंब होत होता. त्यामुळे अनेक अर्जदारांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. अर्जदारांची या अडचणी लक्षात घेऊन सोडतीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.’’

  सोडतीचे सुधारित वेळापत्रक

  ऑनलाइन अर्ज करण्यासाठी नोंदणीची अंतिम मुदत-२० ऑक्‍टोंबर

  ऑनलाइन रक्कम स्वीकृतीची अंतिम मुदत – २१ ऑक्टोबर

  स्वीकृत अर्जांची प्रारुप यादी प्रसिद्ध – २७ ऑक्टोबर

  अंतिम यादी प्रसिद्ध – ३ नोव्हेंबर

  अंतिम सोडत – ९ नोव्हेंबर स. १० वाजता

  यशस्वी आणि प्रतीक्षा यादीतील नावे जाहीर – २७ ऑक्टोबर सायंकाळी सहा वाजता