परताव्याचे आमिष दाखवून गंडा; तिघांची तब्बल ‘इतक्या’ लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत मुंबई येथील एका व्यक्तीने पुण्यातील तिघांना 25 लाखांचा आर्थिक गंडा घातल्याचे समोर आले आहे.

    पुणे : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत मुंबई येथील एका व्यक्तीने पुण्यातील तिघांना 25 लाखांचा आर्थिक गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी, चतुःश्रृंगी पोलिसांनी समीर गुलाबराव थिट्टे (वय 42,रा. विक्रोळी) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबात शरद पाठक (वय ७९,रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे.
    दरम्यान थिट्टे हा सध्या ठाणे येथील श्रीनगर पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्यावर तेथे देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. एमपीआयडीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल असून, तो गुन्ह्याच्या कोठडीत आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाठक यांनी एका जाहिरातीच्या माध्यमातून आरोपी थिट्टे याच्याशी संपर्क साधला होता. थिट्टे याने बाणेर येथील कपिल मल्हार सोसायटीजवळ बाटा शोरुम समोर ऑफिस थाटले होते. सुरवातीला फिर्यादी यांनी पन्नास हजार रुपयांची गुंतवणूक थिट्टेकडे केली होती. त्याने काही दिवसांतच त्यांना गुंतवणुकीवर आकर्षक परतावा दिला. त्यामुळे पाठक यांना विश्वास वाटला. त्यांनी आणि इतरांनी थिट्टे याच्याकडे 25 लाखांची गुंतवणूक केली.
    मात्र त्यानंतर पाठक आणि इतरांना थिट्टे याने ना मूळ रक्कम दिली ना त्यावरील नफा. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यावेळी थिट्टे याने इतरांची देखील अशीच फसवणूक केल्याचे पुढे आले. पोलिसांकडे आत्तापर्यंत तिघे तक्रारदार आले असून, फसवणुकीतील आकडा वाढण्याचा अंदाज आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.