नागपूर स्टेशनवर दुकान चालवण्यासाठी खंडणीची मागणी; पोलिसांकडून तिघांवर कारवाई

नागपूर रेल्वे स्थानकावर दुकान लावणाऱ्यांकडून खंडणी वसूल करणाऱ्या तिघांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

    नागपूर : रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अनेकजण खाण्याच्या पदार्थांचे स्टॉल लावत असतात. अनेकांचा उदर्निवाह या स्टॉलवर अवलंबून असतो. मात्र रेल्वे स्टेशनवर स्टॉल लावण्यासाठी पैसे घेत असल्याचा प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर दुकान लावणाऱ्यांकडून खंडणी वसूल करणाऱ्या तिघांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

    नागपूर रेल्वे स्थानकावर नेहमीप्रमाणे दुकान लावले जात होते. मात्र स्टेशन परिसरात दुकान लावणाऱ्या दुकानदारास दुकान चालवण्यासाठी खंडणी मागण्यात आली. त्याने पैसे देण्यास विरोध केल्याने दुकानातील साहित्य फेकून देत दुकानदारास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी खंडणी मागणी व मारहाण केल्याप्रकरणी दुकानदाराने बर्डी पोलिसात अज्ञात गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    पोलिसांनी (Police) सदर प्रकरणाचा तपास करत तिघांना अटक करण्यात आली. या तिघांपैकी दोन जण हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. यात चेतन गोखले, सोमनाथ उर्फ बाळू जाधव असे नाव असून बाळूला तडीपारीची कारवाई सुद्धा करण्यात आली होती. या प्रकरणी पुढील तपास बर्डी पोलीस करत आहे.