गणेशोत्सवातील ‘फिरत्या हौदां’ची सुविधा यंदा बंद; शहरात सुमारे ४५५ कृत्रिम हौदांची व्यवस्था, मूर्तिदान केंद्रांची संख्या वाढणार

    पुणे : कोरोना काळात ‘सोशल डिस्टन्सिंग’साठी गणेशोत्सवामध्ये सुरू करण्यात आलेली फिरत्या हौदांची सुविधा यावर्षी बंद करण्यात येणार आहे. याऐवजी हौदांची आणि मूर्तिदान केंद्रांमध्ये वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेतर्फे शहराच्या विविध भागांत सुमारे ४५५ कृत्रिम हौदांची व्यवस्था केली जाणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुणे महापालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. यामध्ये प्रामुख्याने नदी व नैसर्गिक स्रोतांमध्ये मूर्ती विसर्जन होऊ नये, यासाठी मागील काही वर्षांमध्ये कृत्रिम हौद आणि मूर्तिदान केंद्राची संकल्पना राबविण्यात येत आहे.

    पीओपीच्या मूर्तींचे प्रमाण वाढणार

    गेले काही वर्ष महापालिकेतर्फे पीओपीच्या मूर्तींचे पाण्यात विघटन व्हावे यासाठी अमोनियम बायकार्बोनेटची पावडर खरेदी केली जात होती. पण प्रदूषण महामंडळाने पीओपीच्या मूर्ती उत्पादनावर बंदी आणल्याने महापालिकेने ही खरेदी केली नाही. पण, आता विधिमंडळात पीओपीच्या मूर्ती उत्पादन, विक्रीवरील बंदी उठविण्यात आलेली नसल्याने विसर्जनामध्ये पीओपीच्या मूर्तींचे प्रमाण वाढणार आहे.

    महापालिकेकडून खबरदारी

    अमोनियम बायकार्बोनेटची पावडर नाही. त्यामुळे नागरिकांकडून नदी, नाले, कॅनॉल, विहिरी यांसह इतर नैसर्गिक जलस्रोत असलेल्या ठिकाणी या मूर्ती विसर्जित करून हे ठिकाण प्रदूषित करू नये यासाठी महापालिकेकडून खबरदारी घेतली जाणार आहे.

    कृत्रिम विसर्जन हौदांची संख्या वाढविण्याचे आदेश

    क्षेत्रीय कार्यालयांना मूर्ती संकलन केंद्र, कृत्रिम विसर्जन हौदांची संख्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून घनकचरा व्यवस्थापन विभागाने माहिती मागवली आहे. प्रशासनाकडे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सुमारे ४५५ हौदांची व्यवस्था होऊ शकते असे समोर आले आहे. आवश्यकतेप्रमाणे यामध्ये वाढ केली जाऊ शकते, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

    महापालिकेच्या वतीने फिरत्या विसर्जन हौदाची संकल्पना

    दरम्यान, २०२० मध्ये कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने फिरत्या विसर्जन हौदाची संकल्पना राबविली होती. त्यामुळे नागरिकांना घरापर्यंत विसर्जनाची सोय झाली होती. २०२१ आणि २०२२ च्या गणेशोत्सवामध्येदेखील ही संकल्पना राबविण्यात आली. यंदा मात्र फिरत्या सुविधा बंद करणे आणि शहराच्या वाढत्या विस्तारानुसार तसेच जेथे अधिकची गरज असेल त्याठिकाणी जागेच्या उपलब्धतेनुसार आणखी विसर्जन हौद बांधण्यासाठी आणि मूर्तिदान केंद्रांची संख्या वाढविण्याचे विचाराधीन असल्याचे महापालिकेतील उच्च पदस्थ अधिकार्‍याने सांगितले.

    जिल्हा प्रशासनाकडे खाणीची मागणी
    गणेश विसर्जन हौद आणि मूर्तिदान केंद्रांमध्ये जमा होणार्‍या गणेशमूर्ती अंतिमत: वाघोली येथील खाणींमध्ये विसर्जित करण्यात येतात. प्रामुख्याने या खाणी खासगी मालकीच्या असून, यासाठी महापालिका खाणमालकांना पैसेही देते. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवामध्ये गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची वाघोली येथील खाण उपलब्ध व्हावी, यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे.