काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा समोर; ‘हाथ से हाथ जोडो’ मोहिमेच्या नियोजनाला प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांची पाठ

काँग्रेसच्या (Congress) ‘हाथ से हाथ जोडो’ मोहिमेच्या निमित्ताने पक्षातील गटबाजी पुन्हा पुढे आली आहे. प्रांताध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत सोमवारपासून (Monday) पुण्यातून सुरू होणाऱ्या मोहिमेच्या नियोजनासंदर्भात आयोजित बैठकीला प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. मोहिमेची सुरुवात कोठून करायची, यावरूनही काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे.

    पुणे : काँग्रेसच्या (Congress) ‘हाथ से हाथ जोडो’ मोहिमेच्या निमित्ताने पक्षातील गटबाजी पुन्हा पुढे आली आहे. प्रांताध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत सोमवारपासून (Monday) पुण्यातून सुरू होणाऱ्या मोहिमेच्या नियोजनासंदर्भात आयोजित बैठकीला प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. मोहिमेची सुरुवात कोठून करायची, यावरूनही काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे.

    पुणे शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने प्रांताध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे, तसेच विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘हात से हात जोडो’ या राज्यस्तरीय मोहिमेचा प्रारंभ गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथून होणार आहे. त्यासाठीच्या नियोजन बैठकीकडे प्रदेश स्तरावरील काही पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे, मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोहिमेचे नियोजन करण्यात आले. प्रदेशाध्यक्षांनी कोणत्या प्रभागात जायचे, यावरून वादावादी झाल्याचे काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

    ‘भारत जोडो’त दिलेला संदेश बळकट करणार

    राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेतून दिला गेलेला संदेश अधिक बळकट करण्यासाठी संपूर्ण राज्यात ही मोहीम राबविली जाणार आहे. मोहिमेत प्रत्येक प्रभागातील घराघरांत काँग्रेसचा विचार, ध्येयधोरणे, भारत जोडो यात्रेची उद्दिष्ट पोहचविण्यात येणार आहे. त्यासाठी नेते आपापल्या भागात स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.