भाजपकडून फडणवीसांचा ‘तो’ VIDEO ट्वीट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा 'मी पुन्हा येईन' हा व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत दिले. या ट्विटने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. भाजपच्या या ट्वीटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

    मुंबई : महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ हा व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत दिले. या ट्विटने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. या ट्विटची चर्चा सुरूच असतानाच ट्विट डिलीट करण्यात आलं. त्यामुळं भाजपात नेमकं चाललंय? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. भाजपच्या या ट्वीटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    मी भाजपने ट्वीट केलेला व्हिडीओ पाहिला नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावध भूमिका घेतली. दुसरीकडे उदय सामंत वगळता शिंदे गटाच्या कुठल्याही नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. भाजपने असा व्हिडिओ का ट्विट केला हे त्यांच्या नेत्यांना विचारावे लागेल, असं मंत्री उदय सामंत म्हणाले.

    दुसरीकडे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा फडणवीसांच्या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली. एका ट्वीटवरुन काहीही संकेत दिले जात नाहीत. यातून कोणताही संकेत देण्यात आला नाही, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर अनेकांनी शपथविधी कधी आहे? असा प्रश्न विचारला. यानंतर भाजपने अवघ्या तासाभरात ही पोस्ट डिलिट केली.

    फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट

    नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन… या शीर्षकाखाली महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ ट्वीट केला होता. ३१ सेकंदाचा हा व्हिडीओ होता. यामध्ये मी पुन्हा येईन… नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, मी पुन्हा येईन… गावांना जलयुक्त करण्यासाठी, मी पुन्हा येईन… शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…, असं देवेंद्र फडणवीस बोलताना दिसून येत होते.