‘त्या’ चार बेपत्ता मजुरांचा शोध घेण्यात दुसऱ्या दिवशीही अपयश

म्हसोबावाडी तालुका इंदापूर या ठिकाणी विहिरीची भिंत कोसळून गाडल्या गेलेल्या चार बेपत्ता मजुरांचा शोध घेण्यात दुसऱ्या दिवशीही अपयश आले असून एनडीआरएफ पथकाच्या माध्यमातून शोध मोहीम दुसऱ्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू आहे.

    बारामती: म्हसोबावाडी तालुका इंदापूर या ठिकाणी विहिरीची भिंत कोसळून गाडल्या गेलेल्या चार बेपत्ता मजुरांचा शोध घेण्यात दुसऱ्या दिवशीही अपयश आले असून एनडीआरएफ पथकाच्या माध्यमातून शोध मोहीम दुसऱ्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू आहे. विहिरीला पायऱ्या नसल्याने छोटे पोकलेन मशीन क्रेनच्या साह्याने सुरुवातीला विहिरीत सोडण्यात आले, मात्र विहिरीतील मुरूम मिश्रित गाळ या मशीनच्या सह्याने काढण्यात अडचण येत असल्याने मोठे पोकलेन मशीन विहिरीत उतरवण्यासाठी रॅम्पचे काम सुरू करण्यात आले.

    इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी या ठिकाणी सुमारे १२० फूट खोल आणि १२५ फूट व्यास असलेल्या विहिरीचा सिमेंटचा कठडा तयार करण्याचे काम सुरू असताना अचानक मुरूम आणि मातीचा ढिगारा कोसळल्याने त्याखाली काम करणारे सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२), जावेद अकबर मुलाणी(वय ३०), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय ३०), लक्ष्मण उर्फ मनोहर मारुती सावंत (वय ५५) हे चार मजूर गाडले गेले आहेत. हे चारही मजूर बेलवाडी (ता. इंदापूर) येथील आहेत. रात्री हे चौघेजण घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर विहिरीच्या ठिकाणी आल्यानंतर विहिरीचा कठडा कोसळल्याचे दिसून आले, यानंतर सदर चौघेजण याठिकाणी गाडले गेल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच एन डी आर एफ पथक दाखल झाले. ढासळलेला भाग पोकलेन मशीनच्या सहायाने काढून मजुरांचा शोध घेण्यास सुरू करण्यात. करण्यात आली. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे स्वतः घटनास्थळी दिवसभर थांबून होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, तहसीलदार श्रीकांत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह इतर महसूल विभागाचे अधिकारी थांबून आहेत. पहिल्या दिवशी विहिरीच्या बाजूला पडलेला मुरूम पोकलेन च्या साह्याने उकरून शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र बेपत्ता मजूर सापडले नाहीत. रात्री उशिरा काम थांबवण्यात आले. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि ३) सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. क्रेनच्या सहाय्याने छोटे पोकलेन मशीन विहिरीत उतरवण्यात आले, विहिरीतील पडलेली माती व मुरूम या छोट्या पोकलेन मशीनच्या सहाय्याने काढण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे मोठे मशीन विहिरीत उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र या मोठ्या विहिरीला पायऱ्या नसल्याने रॅम्पचे काम सुरू करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. शुक्रवारी (दि ४) हे काम पूर्ण झाल्यानंतर सकाळी मोठे पोकलेन मशीन विहिरीत उतरवण्यात येणार आहे. या विहिरीच्या तळामध्ये मुरूम व मातीच्या ढिगाऱ्याखाली सदर चौघे मजूर अडकले असल्याची शक्यता आहे. दरम्यान या विहिरीच्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. एनडीआरएफ चे पथक स्वतःचा जीव धोक्यात घालून ही शोध मोहीम राबवत आहेत. बेलवाडी परिसरातील ग्रामस्थ देखील या ठिकाणी थांबून आहेत. बेपत्ता मजुरांचा शोध घेण्यास विलंब होत असल्याने त्यांचे नातेवाईक वैतागले आहेत. दरम्यान या ठिकाणी भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड शरद जामदार, उद्योजक अर्जुन जामदार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, राष्ट्रवादीचे हेमंत निंबाळकर, भाऊसाहेब सपकळ, सचिन सपकाळ आदींसह इतर राजकीय पदाधिकारी देखील थांबून आहेत.