medicines copy

महाराष्ट्र राज्यात मागील काही महिन्यांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने किरकोळ व होलसेल औषध विक्रेत्यांकडे पाहणी केली असता बनावट औषधे आढळून आली. ही औषध परराज्यातून येत असल्याने त्यावर आळ घालण्यासाठी पुणे केमिस्ट असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्र्यांना परराज्यातून येणाऱ्या बनावट औषधांवर आळा घालण्याची मागणी केली होती.

  पिंपरी :  महाराष्ट्र राज्यात मागील काही महिन्यांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने किरकोळ व होलसेल औषध विक्रेत्यांकडे पाहणी केली असता बनावट औषधे आढळून आली. ही औषध परराज्यातून येत असल्याने त्यावर आळ घालण्यासाठी पुणे केमिस्ट असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्र्यांना परराज्यातून येणाऱ्या बनावट औषधांवर आळा घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार एफडीएने आता किरकोळ व होलसेल व्यावसायिकांना परराज्यातून आलेल्या औषधांचा तपशील कळविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बनावट औषध खरेदीला आळ बसण्यास मदत होणार आहे.

  महाराष्ट्रात ठाणे, मुंबई, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये बनावट औषधे सापडली होती. बनावट औषधांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत असल्याने पुणे केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी मागील वर्षी मुख्यमंत्री कार्यालयाला ई-मेलद्वारे बनावट औषध खरेदीला आळा घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सरकारने अन्न व औषध प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने परिपत्रक काढून राज्यातील सर्व विभागीय सह आयुक्त (औषधे), सहायक आयुक्त (औषधे) व औषध निरीक्षक यांना राज्यात किरकोळ व होलसेल विक्रेते यांना परराज्यातून औषधांचा खरेदी केली तर त्याचा तपशील देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे राज्यात बनावट औषधांचा शिरकाव होण्यास पायबंद बसू शकतो.

  अन्न व औषध प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकाचे राज्यातील किरकोळ व होलसेल विक्रेत्यांनी काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. जर यात दोषी आढळल्यास त्यावर रितसर कारवाई करण्यात येईल. तसेच प्रत्येक एफडीएच्या कार्यालयाने घेतलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभागीय कार्यालयामार्फत मुख्यालयास सादर करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्‍त भूषण पाटील यांनी दिले आहेत.

  कार्यालयाकडून अशी होणार अंमलबजावणी
  परराज्यातून येणारा औषधांचा तपशील जतन करण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्हा कार्यालय व विभागीय कार्यालयात स्वतंत्ररित्या ई-मेल आयडी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदरचा ई-मेल आयडी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व औषध विक्रेत्यांच्या निदर्शनास आणून त्याबाबत परराज्यांतील औषध खरेदी संदर्भात बिले त्या ई-मेलवर दैनंदिनरित्या नियमितपणे पाठविण्याचे निर्देश द्यावेत. ई-मेलवर प्राप्त बिलांचा अभिलेखा नियमितपणे पडताळून परराज्यातून खरेदी करणारे औषध विक्रेत्यांच्या आवश्‍यकतेनुसार तपासण्या करण्यात याव्यात व अनियमितता आढळून आल्यास कारवाई करावी.

  या ई-मेलवर पाठवा बिले
  परराज्यातून येणारी सर्वच औषधे बनावट नाहीत. परंतु मागे राज्यात बनावट औषधांचा साठ मिळून आला. ही औषधे कुठून आली याचा तपास केला असता ते परराज्यातून आल्याचे उघड झाले. अशा बनावट औषधांना आळा घालण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील किरकोळ व होलसेल औषध विक्रेत्यांनी परराज्यातून औषधांची खरेदी केली तर fdapuneinfo@gmail.com या ईमेलवर त्याचा तपशील देणे बंधनकारक आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी हा ई-मेल वेगळा असणार आहे.

  राज्यात मागे काही बनावट औषधे मिळून आली. त्याचा तपास केला असता परराज्यातून खरेदी झाल्याचे निदर्शनास आल्याने बनावट औषध विक्री रोखण्यासाठी किरकोळ व होलसेल औषध विक्रेत्यांनी खरेदीची बिले आपल्या जिल्ह्यातील एफडीए कार्यालयाला जमा करावीत. ही योजना औषध विक्रेते व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्‍त आहे. तसेच बनावट औषधांवर नियंत्रण ठेवणे सहज शक्‍य होणार आहे.

  – श्‍याम प्रतापवार, सहायक आयुक्‍त, पुणे.