चक्क वापरली जातीये मुख्यमंत्री शिंदे यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के; धक्कादायक बाब आली समोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खोट्या स्वाक्षरी वापरल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार्यवाहीसाठी आलेल्या निवेदनावरुन मुख्यमंत्री सचिवालयास ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खोट्या स्वाक्षरी वापरल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार्यवाहीसाठी आलेल्या निवेदनावरुन मुख्यमंत्री सचिवालयास ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. या प्रकारामुळे मंत्रालयामध्ये धक्का बसला असून अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

    मुख्यमंत्री सचिवालयाला नुकत्याच मिळालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. या बाबीची मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दाखल घेतली आहे. तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. त्यानुसार मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने व पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई ऑफिस प्रणालीत नोंद केली जाते. त्यानंतर संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येते. त्यानंतर कार्यवाही केली जाते.