कांद्याच्या दरात होतीये घसरण; गेल्या 15 दिवसांपासून दर सातत्याने होताहेत कमी

गेल्या ऑक्टोबर महिन्यातील २६ तारखेला ६० रुपयांवर गेलेले कांद्याचे बाजार रविवारी ४० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर (Onion Export) लावण्यात आलेले ४० टक्क्यांचे शुल्क कमी केल्यानंतरही गेल्या १५ दिवसांपासून कांदा दरात घसरण सुरूच आहे.

    नाशिक : गेल्या ऑक्टोबर महिन्यातील २६ तारखेला ६० रुपयांवर गेलेले कांद्याचे बाजार रविवारी ४० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर (Onion Export) लावण्यात आलेले ४० टक्क्यांचे शुल्क कमी केल्यानंतरही गेल्या १५ दिवसांपासून कांदा दरात घसरण सुरूच आहे. त्यातच राजस्थान, कर्नाटक आदी राज्यांसह कोल्हापूर परिसरात नवीन कांद्याला सुरुवात झाल्यामुळे बाजारात जुन्या कांद्याला मागणी कमी झाली आहे.

    तसेच केंद्र सरकारने उन्हाळ कांद्याला एमईपीची मर्यादा घातल्यामुळे दर घसरल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात रविवारी कांद्याची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत निम्मीच झाली. गेल्या आठवड्यात कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी निवडक कांदा विक्रीस आणला नाही. यावेळी जुन्नरला ९ हजार ७९७ कांदा गोण्यांची आवक झाली.

    गेल्या पंधरवड्यात कांदा दर ६० रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, भाव पुन्हा घसरल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर, व्यापाऱ्यांना चढ्या भावांत खरेदी केलेला कांदा विकताना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. ६० रुपये खरेदीचा कांदा नुकसान सोसून ४०-४५ रुपयांना विकल्याचे येथील व्यापारी सांगतात.