विधान परिषदेतील १० आमदारांची मुदत संपल्याने सदस्यांना निरोप, जूनमध्ये संपणार आहे मुदत, मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता

यावर्षी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या एकूण 10 विधानपरिषदेच्या आमदारांच्या सदस्यत्वाची मुदत जून व जुलै महिन्यात संपत आहे. त्यामुळं या सर्व सदस्यांना बुधवारी निरोप देण्यात आला. यावेळी विधिमंडळाच्या आवारात छोटेखानी निरोप समारंभ आयोजित केला होतो, तसेच प्रांगणात फोटो सेशन सुद्धा करण्यात आले.

    मुंबई : राज्य सरकारचे विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा सुरु आहे. शुक्रवारी अधिवेशनाची सांगता होणार आहे. या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे मुद्दे गाजले. दरम्यान, यावर्षी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या एकूण 10 विधानपरिषदेच्या आमदारांच्या सदस्यत्वाची मुदत जून व जुलै महिन्यात संपत आहे. त्यामुळं या सर्व सदस्यांना बुधवारी निरोप देण्यात आला. यावेळी विधिमंडळाच्या आवारात छोटेखानी निरोप समारंभ आयोजित केला होतो, तसेच प्रांगणात फोटो सेशन सुद्धा करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सभापती रामराजे निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे तसेच या पक्षातील आमदार उपस्थित होत्या. दरम्यान या सदस्यांनी सभागृहात शेवटचे भाषण केले. हे भाषण खूप भावनिक होते.

    विधान परिषदेतील या सदस्यांची जून जुलैमध्ये मुदत संपणार आहे. 10 आमदारांमध्ये भाजपचे पाच, शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादीच्या दोन आमदारांचा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर आणि संजय दौंड यांचा समावेश आहे. तर भाजपचे आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण यशवंत दरेकर, भाजपपुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत, सुजितसिंग ठाकूर, विनायक मेटे आणि प्रसाद लाड यांना निरोप देण्यात आला.

    दरम्यान, यावेळी सभागृहात आपले शेवटचे भाषण करताना, दिवाकर रावते आणि सदाभाऊ खोत भावूक झाले होते, आपण सहा वर्ष विधानभवनात येतोय, याच्या खूप मनात आठवणी आहेत. येथे पुन्हा कधी यायला मिळेल हे सांगता येणार नाही, पण आपण अनेक महत्त्वाच्या निर्णयाचे साक्षीदार असल्याचं आमदार सदाभाऊ खोत व दिवाकर रावते यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली.