
पुणे/केळकर रोड : लाडक्या गणरायाला निरोप देताना, पुण्यनगरी गुलाल आणि ढोल-ताशांच्या निनादाने न्हाऊन निघाली त्यात वरुणराजाने हजेरी लावल्याने ढोल पथकांचा आणखी पाहायला मिळाला. भर पावसात तरुणाई लाडक्या बाप्पाला निरोप देताना मोठ्या जल्लोषात थिरकताना दिसत होती. केळकर रोडवर आमच्या पप्पाने गणपती आणला, पाटलांचा बैल गाडा, मै हू डॉन, अहो शेठ खूप दिवसांनी झालीया भेट, श्रीवल्ली, अश्विनी ये ना, तुझ्या रूपाचं चांदणं… या मराठी आणि हिंदी गाण्यांवर केळकर रस्त्यावरील गणपती विसर्जन मिरवणुकीत तरुणाई बेधुंद झाली होती.
केळकर रोड मिरवणुकीत 97 मंडळांचा सहभाग
काही मंडळांनी देखावा सादर करून केल्याने यामध्ये आणखी भर पडत होता. यंदा केळकर रस्त्यावर मिरवणुकीत 97 मंडळांनी सहभाग घेतला. या रस्त्यावरून पहिल्यांदा श्री गणेश कृपा मित्र मंडळ, शनिवार पेठ नारायण पोलिस चौकी येथून शुक्रवारी दुपारी 12 वाजून 45 वाजता, तर सर्वात शेवटी शनिवारी (ता. 29) दुपारी 2.00 वाजता सम्राट अशोक ट्रस्ट, रास्ता पेठचा राजा अलका टॉकीजकडे मार्गस्थ झाला.
डॉल्बी साउंड सिस्टीमकडेच तरुणाईचा कल
‘गणपती बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…’ या जयघोषात लाडक्या बापाला निरोप दिला. पुणयाच्या वैभवशाली परंपरा असलेल्या बाप्पाच्या मिरवणुकीत तरुणाईचे आकर्षण असणार्या डॉल्बी साउंड सिस्टीमनेच (डीजे) तरुणाईची गर्दी खेचण्यात यश मिळविल्याचे दिसून आले. केळकर रस्त्यावरील बहुतांशी मंडळांनी देखावा कमी अन् डीजेचा वापर जास्त केला होता. त्यामुळे या रस्त्यावर तरुणाई बरोबर आबालवृद्धानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तरुणांसह लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनीही विसर्जन मिरवणुकीत नाचण्याचा आनंद लुटला. एवढ्या गर्दीतही महिलांना नाचण्यासाठी जागा करून दिली जात होती.
मराठी हिंदी गाण्यांवर धरला ठेका
सर्वसाधारणपणे मिरवणुकीमध्ये बघ्यांची गर्दी दिसून येत असते. मात्र या मिरवणूक प्रत्यक्ष सहभाग घेणार्यांची संख्या अधिक होती. कानठळ्या बसणार्या डीजेच्या आवाजाने मिरवणुकी बघायला आलेल्या नागरिकांना वेड लावले होते. एकीकडे मराठी हिंदी गाण्यांचा दणदणाट आणि दुसरीकडे तरुणाईची गर्दी यामुळे या रस्त्यावर गर्दी खूप झाली होती. रात्री 12 वाजल्यानंतरही काही मंडळांकडून डीजेचा दणदणाट सुरू होता. त्यामुळे तरुणाईला थिरकण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन मिळत होती.
दुसर्या दिवशीही मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसर्या दिवशी निर्बंधमुक्त वातावरणात गणरायाला निरोप देताना भाविकांमध्ये उत्साह कायम होता. गणेश मंडळांनी तयार केलेले आकर्षक देखाव्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. तर, बहुतांश मंडळांनी उभारलेल्या डीजेचा दणदणाटात कार्यकर्ते बेभान होऊन नाचत होते. पावसाच्या सरीतही कार्यकर्ते बेभान होऊन नाचत होते. शेवटपर्यंत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष मात्र कायम होता.