बारामती शहरात भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप; पारंपरिक वाद्यांसह डीजे’चा मिरवणुकीत सहभाग

बारामती शहरामध्ये पारंपारिक वाद्यांसह डीजेच्या तालात विविध मंडळांनी गणरायाची मिरवणूक काढून मोठ्या भक्तीमय वातावरणात गणेश मूर्तींचे विसर्जन केले. बारामती नगरपालिकेच्या वतीने शहरातील निरा कालव्याच्या विविध ठिकाणी कृत्रिम जलकुंभ तयार केल्याने पर्यावरण पूरक पद्धतीने सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

  • ३४३९ गणेश मूर्तींचे कृत्रिम जलकुंभात विसर्जन

बारामती : बारामती शहरामध्ये पारंपारिक वाद्यांसह डीजेच्या तालात विविध मंडळांनी गणरायाची मिरवणूक काढून मोठ्या भक्तीमय वातावरणात गणेश मूर्तींचे विसर्जन केले. बारामती नगरपालिकेच्या वतीने शहरातील निरा कालव्याच्या विविध ठिकाणी कृत्रिम जलकुंभ तयार केल्याने पर्यावरण पूरक पद्धतीने सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या कृत्रिम जलकुंभात विसर्जन केलेल्या सुमारे ३४३९ गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. तसेच डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्य संकलन करण्यात आले, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण वाचवण्यात नगरपालिका प्रशासनासह डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानला यश आले.

बारामती शहरात शुक्रवारी सकाळपासून घरगुती गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला. बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी दुपारी मिरवणूक काढून गणेश मूर्तींचे विसर्जन केले. बारामती नगरपालिकेने ठिकठिकाणी कृत्रिम जलकुंभाची निर्मिती केली होती, त्याच ठिकाणी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली होती. बारामती शहरात सायंकाळी चार नंतर सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. निवडणुकीच्या सुरुवातीला बारामती शहरातील ५० वर्षापूर्वी स्थापन झालेल्या व मानाचा समजला जाणारा अखिल मंडई मंडळ ट्रस्टची गणेश मूर्ती होती. या मंडळासमवेत श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान बारामती येथील वाद्य पथक, जयोस्तुते वाद्य पथक हे प्रमुख आकर्षण होते.

यावेळी पन्नास वर्षांपूर्वी स्थापन केलेली गणरायाची मूर्ती आकर्षक रथामध्ये आरुढ झालेली होती. या मंडळाचे उत्सव समितीचे अध्यक्ष निलेश धालपे, संस्थापक अध्यक्ष रवींद्र धालपे, यांच्यासह उपाध्यक्ष पांडुरंग आटोळे, सेक्रेटरी जयंत धालपे, सह सेक्रेटरी शरद धेंड, उत्सव प्रमूख महावीर जवारे, खजिनदार सुधीर वाडेकर, सेक्रेटरी आशिष घोरपडे, सह सेक्रेटरी मंगेश पवार आदींसह विश्वस्त निलेश धालपे, सतीश राक्षे, कन्हैयालाल धनवाणी, बाळकृष्ण कांबळे, राजेंद्र घुमरे, अविनाश गलांडे आदींसह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मंडळाच्या पाठोपाठ अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळाचा श्रीमंत आबा गणपतीचा आकर्षक रथ होता. या रथासोबत एमइएस हायस्कूलसह जनहित प्रतिष्ठान यांचे ढोल पथक तसेच तुतारी ग्रुप होता. मावळा ग्रुप च्या वतीने उंट व घोड्यांचा सहभाग होता.

अखिल तांदुळवाडी वेस तरूण मंडळाचा श्रीमंत आबा गणपति रथ बारामतीतील मिरवणूकीच्या आकर्षण व चर्चेचा विषय ठरला. हा रथ शिवराज मंडप चे संतोष साळुंके यांनी साकारला होता. मिरवणुकीची सुरवात दुपारी चार वाजता श्रीमंत आबा गणपतीची आरती सुभाष सोमाणी, श्याम इंगळे, योगेश चिंचकर, करण वाघोलीकर, सुनील लडकत, रमेश पंजाबी, प्रकाश पळसे, रामलाल रायका, निखिल लोंढे, चेतन जाधव, प्रेमराज गायकवाड, श्रीकांत जाधव, वैभव जगताप, नितेश सावंत या मान्यवरांच्या हस्ते करून ढोल पथकाला नारळ वाढवण्यात आला. मिरवणुकीत जनहित प्रतिष्ठान व म. ए. सो हायस्कूल चे ढोल पथक सामील होते तसेच उंट, घोडे, तुतारी व हलगी ग्रूप चा ही समावेश होता तसेच मंडळाच्या महीलांचाही मिरवणुकीत विशेष सहभाग होता. मंडळाने प्राणप्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन नगरपालिकेने केलेल्या कुंडात केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मावळ्यांच्या वेशभूषा कार्यकर्त्यांनी साकारल्या होत्या. अखिल तांदुळवाडी वेस व अखिल मंडई ट्रस्टच्या ढोल पथकाच्या निनादात वातावरण भक्तीमय झाले होते. शहरातील सुमारे सात ते आठ मंडळांनी सहभाग घेतला होता. डीजेच्या तालावर गणेश भक्त थिरकले होते. बारामती एमआयडीसी येथील इच्छापूर्ती गणेश मंडळाची २१ फुटी गणेश मूर्ती अनेकांचे लक्ष वेधून घेत होती.

बारामती येथील टकार कॉलनी येथील क्षत्रिय तरुण गणेश मंडळाने भव्य शिवलिंग प्रतिकृती साकारली होती. शहरातील श्रीराम गल्ली येथील गणेश मंडळ तसेच इतर मंडळांनी देखील आकर्षक सजावट केली होती. सदर मिरवणूक पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. रात्री बारा वाजता पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार वाद्य बंद करण्यात आली. रात्री एक वाजता ही मिरवणूक शांततेत पार पडली. दरम्यान बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ७२ गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तींची स्थापना केली होती. तर ४,७३० घरगुती गणपतीची स्थापना केली होती.

शहरातील कऱ्हा नदी दुथडी वाहत असल्याने काही प्रमाणात नागरिकांनी नदीपात्रात मूर्तींचे विसर्जन केले. बारामती शहर व परिसरातील गणेशोत्सव व विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. बारामती शहरात नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह इतर नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करण्यासाठी प्रयत्न केले.