‘ई-श्रम’ नोंदणीत शेतमजूर अव्वल; पोर्टलचा देशातील ४० कोटी कामगारांना होणार फायदा

असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षाम प्रदान करण्यासाठी सुरू केलेल्या ई- श्रम योजनेत पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील आतापर्यंत ६ लाख ११ हजार ७०५ जणांनी नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक २ लाख ४६ हजार ९०८ शेतमजुरांनी नोंदणी केली आहे.

पिंपरी : असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षाम प्रदान करण्यासाठी सुरू केलेल्या ई- श्रम योजनेत पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील आतापर्यंत ६ लाख ११ हजार ७०५ जणांनी नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक २ लाख ४६ हजार ९०८ शेतमजुरांनी नोंदणी केली आहे. तर काच व फरशी उद्योगाशी संबंधित केवळ ५१ जणांनी नोंदणी केली आहे.

मजुरांच्या फायद्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ई-श्रम कार्ड (श्रमिक कार्ड योजना) सुरू केले आहे. भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने २६ ऑगस्ट २०२१ रोजी ई-श्रम पोर्टल जारी केले आहे, ज्यावर असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसह स्वतःची नोंदणी करू शकतात. या पोर्टलचा देशातील सुमारे ४० कोटी कामगारांना फायदा होणार आहे.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी ई-श्रम पोर्टल विकसित केले आहे. हे कार्ड आधारशी जोडले जाईल.

त्यात कामगारांचे नाव, व्यवसाय, पत्ता, शैक्षणिक पात्रता, कौशल्य संच आणि कुटुंब इत्यादी तपशील असतील जेणेकरुन त्यांच्या रोजगारक्षमतेचा अधिक वापर करता येईल आणि त्यांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळेल. स्थलांतरित कामगार, बांधकाम कामगार आणि प्लॅटफॉर्म कामगार इत्यादींसह असंघटित कामगारांचा हा पहिलाच राष्ट्रीय डेटाबेस आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर, मजुरांना विशिष्ट क्रमांकासह 12 अंकी लेबर कार्ड जारी केले जाईल, ज्यामुळे त्यांना भविष्यात सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल. या पोर्टलद्वारे सर्व असंघटित कामगारांपर्यंत सरकारी योजनेचा लाभ पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे.

त्यामुळे बांधकाम मजुरांची नोंदणी कमी

या योजनेत बांधकाम मजुरांचा देखील समावेश करण्यात आला आहे. मात्र; महाराष्ट्रात राज्य सरकारकडून बांधकाम कामगारांकरिता खास महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून, या मंडळाकडून विविध या घटकासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यामुळे ई-श्रम योजनेला राज्यात अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. केवळ ४१,८२१ बांधकाम मजुरांची राज्यातून नोंदणी झाली आहे.

अशी झाली आहे जिल्ह्यातील नोंदणी

शेती- २,४६,९०८, इतर- ६४७७२, चामडे प्रक्रिया उद्योग- ४४०६०, घरकामगार- ४२१३२, बांधकाम- ४१८२१, ऑटोमोबाइल व वाहतूक- ३७५७०५, कापड- ३०४६५, कार्यालयीन कामकाज व फॅसिलिटी मॅनेजमेंट- १९००९, भांडवली वस्तू आणि उत्पादन- १७३८४, पर्यटन- १२०५, हेल्थकेअर- ९५६४, इलेक्‍ट्रॉनिक्‍स- ९११५, ब्युटी ऍण्ड वेलनेस- ८१८१, शैक्षणिक – ५९४८, सुरक्षा रक्षक- ५११५, रिटेल- ४८४२, फूड इंडस्ट्री- २७८३, छपाईकाम- १७९८, सोने कारागीर- १७०७, प्रोफेशनल्स- १५०६, सेवा- ११५८, हस्तकला- ११२१, ऑर्गनाइज्ड रिटेल्स- ४८२, खाणकाम- ३३६, लाकूड व सुतारकाम- ३००, संगीत वाद्य- २९२, टेक्‍सटाइल व हॅण्डलूम- २७८, तंबाखू- १९३, बीएफएसआय- १७८, अन्य-१५१ व काच व फरशी-५१

ई-श्रम कार्ड योजनेचे फायदे

अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना सरकारकडून 2 लाख रुपये नुकसान भरपाई

अंशतः अपंग असल्यास एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम

नोंदणीकृत कामगाराला सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ

नोंदणीनंतर, केंद्र सरकार एक वर्षाचा प्रिमीयम भरणार

विमा संरक्षण लागू असेल.