पुण्यात रस्त्याने चालत जाणाऱ्या शेतमजूरांना भरधाव कारने चिरडलं, तिघांचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

कल्याण-नगर मार्गावर आळेफाटा परिसरात भरधाव कारने पाच परप्रांतीय शेतमजुरांना उडविल्याची घटना घडली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    पुणे : कल्याण-नगर मार्गावर आळेफाटा परिसरात भरधाव कारने पाच परप्रांतीय शेतमजुरांना उडविल्याची घटना घडली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    जगदीश महेंद्रसिंह डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेले तिघेजण मूळचे मध्य प्रदेशातील आहेत. दिनेश जाधव, विक्रम तारोले गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डावर, मांजरे, तारोले, जाधव शेतमजूर आहेत. ते मजुरीसाठी आळेफाटा परिसरात आले होते. रविवारी रात्री (२४ सप्टेंबर ) साडेआठच्या सुमारास ते कल्याण- नगर मार्गावरील कठेश्वर पुलावरुन निघाले. तेव्हा पुलाच्या परिसरात अंधार होता. पाठिमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना उडविले.

    अपघात इतका भीषण होता की, या अपघातात डावर, मांजरे, तारोले, जाधव गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन कांडगे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या मजुरांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच डावर, मांजरे, तारोले यांचा मृत्यू झाला होता.