शेतकरी बधाले यांच्या सर्जा-राजाला संताजी महाराजांच्या पालखी रथाचा मान

यंदा आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या सुदुंबरे येथील संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पालखी सोहळ्यातील रथाला जुंपण्याचा मान नवलाख उंबरे (ता. मावळ) येथील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ शेतकरी दत्तोबा धोंडिबा बधाले यांच्या सर्जा-राजा या बैलजोडीला मिळाला आहे.

    देहूरोड : यंदा आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या सुदुंबरे येथील संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पालखी सोहळ्यातील रथाला जुंपण्याचा मान नवलाख उंबरे (ता. मावळ) येथील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ शेतकरी दत्तोबा धोंडिबा बधाले यांच्या सर्जा-राजा या बैलजोडीला मिळाला आहे.

    गेल्या ४५ वर्षांची परंपरा असलेल्या सुदुंबरे येथून संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पालखीतील रथासोबत सात दिंड्या असतात. संत तुकाराम महाराज यांचे टाळकरी संताजी महाराज यांच्या समाधी स्थळापासून २० जूनला दुपारी चार वाजता संताजी महाराजांच्या पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.

    सुदुंबरे गावातीलच आजोळी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये पालखीचा पहिला मुक्काम असणार आहे. दुसऱ्या दिवशी २१ जूनला मंगळवारी सकाळी पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल. या पालखीच्या रथाला जुंपण्यासाठी पाच बैलजोड्यांची पालखी समितीने पाहणी केली होती. त्यापैकी नवलाख उंबरे येथील जेष्ठ शेतकरी दत्तोबा बधाले यांच्या सर्जा-राजाची निवड करण्यात आली. तर अश्वाचा मान दौंड तालुक्यातील हातवळण येथील भानुदास गवळी यांच्या अश्वाला देण्यात आला.

    अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आमच्या सर्जा-राजा या बैलजोडीला संताजी महाराजांच्या पालखी रथास जुंपण्याचा मान मिळाला. त्यामुळे मोठा आनंद झाला आहे. या सेवेतून आम्हाला साक्षात् पांडुरंगाचे दर्शन घडणार आहे.

    – दत्तोबा  बधाले, ज्येष्ठ शेतकरी.