अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकरी त्रस्त; घरात गळफास घेऊन संपवलं जीवन

अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपिटीने तोंडचा घास हिरावल्याने चिंतेत असलेल्या युवा शेतकऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या (Farmer Suicide) केली. ही घटना पातूर तालुक्यातील वरणगाव येथे घडली.

    आलेगाव : अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपिटीने तोंडचा घास हिरावल्याने चिंतेत असलेल्या युवा शेतकऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या (Farmer Suicide) केली. ही घटना पातूर तालुक्यातील वरणगाव येथे घडली. सचिन जाधव (वय 38) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

    अवकाळी पावसामुळे व गारपिटीने सचिन यांच्या 3 एकर शेतातील कांदा, भुईमूग व कांद्याचे बी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्यावर्षीही त्यांच्या शेतातील कांदा पिकाला फार मोठा फटका बसला होता. तेव्हा त्यांनी हार न मानता पीक कर्ज काढून पुन्हा शेती केली. मात्र, वारंवार अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होऊन तोंडचा घास हिरावल्यामुळे व कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे ते सतत चिंतेत राहत होते. या विदारक परिस्थितीला कंटाळून त्यांनी घरातील फॅनच्या अँगलला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

    मुले झाली पोरकी

    सचिन जाधव याने आत्महत्या केल्याने त्याची दोन्ही मुले वडिलांविना पोरकी झाली आहेत. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. मुलगी भाग्यश्री (13), मुलगा शुभम (8) असा परिवार आहे. आत्महत्येच्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.