पिकांना पाणी देताना शेतकऱ्याचा मृत्यू; थंडीने गारठून मृत्यू झाल्याने हळहळ

शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा थंडीने गारठून मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील हर्षी येथे गुरूवारी (दि.१८) सकाळी उघडकीस आली. दरम्यान या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

    पाचोड : शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा थंडीने गारठून मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील हर्षी येथे गुरूवारी (दि.१८) सकाळी उघडकीस आली. दरम्यान या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. संतोष चंद्रभान आगळे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आईवडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे.

    हर्षी बु. (ता. पैठण) येथील शेतकरी संतोष आगळे वय (४६) हे बुधवारी केल्यानंतर जेवन शेतीला रात्रीची वीज असल्याने घरच्यांना स्वतःच्या गट नं (१२५) शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी जात असल्याचे सांगून घरा बाहेर पडले. दरम्यान, काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत असल्याने थंडीत गारठून ते बेशुद्ध होऊन त्यांचा मृत्यू झाला.

    सकाळी उजाडल्यानंतर ते घरी परतले नसल्याने घरच्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून नातेवाईकांनी शेत गाठून पाहिले असता संतोष अगळे हे निपचित पडलेले दिसून आले.

    नातेवाईकांनी त्यांना तातडीने पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. आसाराम चौरे यांनी तपासून मयत झाल्याचे घोषित केले. पाचोड पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केला.या घटनेची पाचोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.