‘लाईटच नाही तर आम्ही बिल कसं भरायचं?’; शेतकऱ्यासोबत ‘इथं’ घडलाय भलताच प्रकार

शेतात सिंचनाची व्यवस्था करून वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी महावितरणकडे अर्ज केले. मात्र, अद्यापही वीजपुरवठा (Electricity Supply) मिळाला नाही. वीजपुरवठा नसताना शेतकऱ्याला थेट 4 हजार 630 रुपयांचे वीज देयक देण्यात आले.

    नारायणपूर : शेतात सिंचनाची व्यवस्था करून वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी महावितरणकडे अर्ज केले. मात्र, अद्यापही वीजपुरवठा (Electricity Supply) मिळाला नाही. वीजपुरवठा नसताना शेतकऱ्याला थेट 4 हजार 630 रुपयांचे वीज देयक देण्यात आले. ही घटना गोविंदपूर येथील विकास नाईक या शेतकऱ्यासोबत घडली. यामुळे पुन्हा एकदा महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रपूर तालुक्यातील गोविंदपूर येथील शेतकरी विकास नाईक यांना जवाहर योजनेतून विहीर मंजूर झाली. त्यांनी अवघड परिस्थितीत खोदकाम व बांधकाम पूर्ण केले. वीजपुरवठा मिळण्यासाठी नियमानुसार डिमांड रक्कम सुद्धा महावितरण कंपनीच्या कार्यालयात भरली.

    एक वर्षापूर्वी शेतात विजेचे खांब व रोहित्रसुद्ध महावितरणने बसवले. पण वीजपुरवठा अजूनही सुरू केला नाही. त्यामुळे शेतातील कपाशी व हरभरा पीक वाळून गेले. महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवून शेतकरी हैराण झाला असून, त्याच्या तक्रारीकडे महावितरण दुर्लक्ष करत आहे.