संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त झालेल्या किटा कापरा व भारी जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसह शिवसैनिकांनी महावितरण कार्यालयावर (MSEB Office) धडक दिली. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांच्या टेबलवरील फाईलींची फेकाफेक करत राडा घातला.

    हिंगोली : महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त झालेल्या किटा कापरा व भारी जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसह शिवसैनिकांनी महावितरण कार्यालयावर (MSEB Office) धडक दिली. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांच्या टेबलवरील फाईलींची फेकाफेक करत राडा घातला. येत्या दोन दिवसांत समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.

    सोयाबीनची परिस्थिती अत्यंत बिकट असून, एकरी एक ते पाच क्विंटलपर्यंत उतारा येत आहे. केंद्र शासनाच्या आयात धोरणामुळे सोयाबीनचे भाव चार हजारांच्या आतमध्ये आहे. अशा परिस्थितीत कापूस पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे. परंतु, महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे विजेच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. जुलै महिन्यात पुराने वाहून गेलेले विद्युत खांब अजूनही दुरुस्त केले नाही. त्यातच वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. किरकोळ दुरुस्त्या करून कर्मचारी काम चालवत आहे.

    तक्रारी देऊनही वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने संतप्त शेतकरी व शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. महावितरणचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांच्या कक्षात जाऊन तालुका शिवसेना (उबाठा) च्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत राडा केला.

    येथील अभियंता डबरासे कुठल्याही प्रकारचे काम करत नाही. याबाबत शेतकरी व शिवसेनेच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी दिल्या. त्यानंतरही तक्रारींकडे मागील तीन महिन्यांपासून अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती झाली आहे.