
तासगाव तालुक्याच्या बहुतांश भागात गेले चार पाच दिवसापासून ढगाळ हवामान आहे. त्यामुळे तालुक्यातील द्राक्षबागांवर 'डाउनी'चा रोगाचा धोका उदभवण्याची शक्यता आहे.
तासगांव : तासगाव तालुक्याच्या बहुतांश भागात गेले चार पाच दिवसापासून ढगाळ हवामान आहे. त्यामुळे तालुक्यातील द्राक्षबागांवर ‘डाउनी’चा रोगाचा धोका उदभवण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे द्राक्षबागायतदार हवालदिल झाला आहे. हवामान बिघडल्याने शनिवार किंवा रविवारी अवकाळी पावसाच्या शक्यतेने द्राक्ष बागायतदार हबकले आहेत. या स्टेजला पाऊस झाला तर फुलोऱ्यात असणाऱ्या बागांची घडकुज व मनीगळ होणार आहे.
तासगाव तालुक्याची ओळख द्राक्षपंढरी म्हणून देश विदेशात ओळख आहे. तालुक्यात हजारो एकर क्षेत्रावर तालुक्यात द्राक्ष शेती केली जाते. तासगावची उच्च प्रतीची द्राक्षे व बेदाणा देश विदेशात निर्यातही केला जातो. गेली तीन वर्षे अवकाळी पावसाने तालुक्यात थैमान घातले. फुलोऱ्यात पाऊस, धुके व ढगाळ हवामानामुळे डाउनी रोगाचा द्राक्ष बागांवर फैलाव झाला होता. घडांचे मणी गळून गेले.
-शेतकऱ्यांचे कोटयवधीचे नुकसान
दरम्यान गतवर्षी डाउनीच्या फैलावाने शेकडो एकर क्षेत्र या रोगास बळी पडले होते. यामुळे शेतकऱ्यांचे कोटयवधीचे नुकसान झाले. सध्या आगाप द्राक्षाची पोंगा, विरळनी, फुलोरा व डिपिंगची अवस्था आहे. या दरम्यान डाऊणीचा फैलाव होण्याची शक्यता असते. त्यातच खराब हवामान व पावसाच्या शक्यतेने द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त बनला आहे. डाउनीचा हल्ला रोखण्यासाठी बागायतदार महागडी औषधे खरेदी करत आहे. या वातावरणाने डाऊनी रोगाची वाढ पानांवर होत आहे. अती पावसामुळे यंदा द्राक्षाचे घड जिरलेत. बागांना माल कमी आहे. त्यातच पाऊस पडला तर उर्वरित द्राक्षाची मोठी हानी होणार आहे. तर गहू, हरभरा, शाळू व अन्य रब्बीच्या पिकांना याचा फायदा होणार आहे.